मदत जाहीर ; निधी प्राप्त, तरीही शेतकरी लाभाविना...

राजेश दारव्हेकर
Tuesday, 23 June 2020

जिल्‍ह्यात २९ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टीचे नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाला निधी आला पण काही शेतकरी अजूनही लाभाविना राहिले आहेत. 

हिंगोली ः मागच्या वर्षी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सर्वेक्षणातून शासनाने नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. त्‍यानुसार जिल्‍ह्यात अनुदान वाटपासाठी निधीदेखील प्राप्त झाला. ४० हजार ४८९ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, तर जिल्‍ह्यात २८ हजार ९०१ शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.

नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्‍कम जमा करण्यासाठी जिल्‍ह्याला तीन टप्प्यात निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत २०३ कोटींच्या वर निधी वाटप करण्यात आला. हा निधी अपुरा असल्याचे वाटपातून स्‍पष्ट झाले. तहसील कार्यालयाने अनुदान वाटप शिल्‍लक असलेल्या शेतकरी संख्या व लागणारा आवश्यक निधी याची माहिती जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी यांनी शासनाकडे आणखी आवश्यक निधीची मागणी काही दिवसांपूर्वी केली आहे. त्‍यानुसार जिल्‍ह्यात अद्यापही २९ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्‍यासाठी २० कोटी ७५ हजार १७४ रुपयांची गरज आहे.  

हेही वाचा - Corona Breaking, हिंगोलीत नव्याने आठ रुग्ण वाढले

तालुकानिहाय शेतकरी आणि अनुदान 
हिंगोली तालुक्‍यातील पाच हजार १७४ शेतकऱ्यांसाठी चार कोटी ८६ लाख ९८ हजार रुपयांची गरज आहे. कळमनुरी तालुक्‍यातील सात हजार ८६८ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना सहा कोटी १७ लाख ३३ हजार २८८ रुपयांची आवश्यकता आहे. औंढा नागनाथ तालुक्‍यातील सहा हजार ४१२ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन कोटी ८० लाख ७०० रुपये लागणार आहेत. वसमत तालुक्‍यातील पाच हजार १६० शेतकरी प्रतीक्षेत आहेत. त्‍यांना तीन कोटी ३८ लाख ३५ हजार १०० रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा - नांदेड ब्रेकींग : दूर्मीळ खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

नवीन पीककर्ज देण्यास टाळाटाळ
जिल्‍ह्यात बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. तीन महिन्यांपासून लॉकडाउन लागू आहे. त्‍यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने पेरणीची कामे सुरू आहेत. पीकविमा अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर रक्‍कम जमा न झाल्याने बँका नवीन पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

४० हजार ४८९ शेतकऱ्यांना लाभ
अनुदानाची गरज असतानादेखील ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांना उधार-उसनवारी करून पेरणी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी नाराज आहेत. मागच्या वर्षी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन स्‍तरावरून अनुदान दिले जात आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या निधीतून ४० हजार ४८९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. २०३ कोटींच्या वर रुपयांचे वाटप करण्यात आले. वंचित राहात असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help announced; Funded, still without farmer benefit ...hingoli news