हिंगोली : उघडले औंढा नागनाथाचे द्वार- झाला हर, हर महादेवाचा गजर

राजेश दारव्हेकर
Monday, 16 November 2020

दरम्यान, रविवारी ता. १५ नागनाथ मंदिर  समितीकडून संपुर्ण मंदिराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असुन काही नियम व अटींनुसार सोमवारी सकाळी दर्शनास प्रारंभ झाला आहे.

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक दिवसांपासून बंद झालेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या मंदिराचे दरवाजे शासन आदेशानुसार दिवाळीच्या पाडव्याला सोमवारी (ता. १६)  उघडण्यात आले. 

दरम्यान, रविवारी (ता. १५) नागनाथ मंदिर  समितीकडून संपुर्ण मंदिराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असुन काही नियम व अटींनुसार सोमवारी सकाळी दर्शनास प्रारंभ झाला आहे.

मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी यांनी सकाळी साडेपाच वाजता  आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत नागनाथाचा अभिषेक केला त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

भाविकांना कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मास्क,  सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शासन निर्णयाची अमंलबजावणी करण्यात आली. आज सकाळी मंदिराच्या प्रवेशद्वार व प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांना हात धुन्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरातील सुरक्षा रक्षक व पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा  नांदेडकरांचा पाडवा गोड : माहूरचे रेणुकादेवी मंदीर भाविकांनी गजबजले, दर्शनाकरिता रांगा -

मंदिर दररोज किमान एक हजार भाविकांना दर्शन घेता येईल असे नियोजन केले आहे. मंदिर दर्शनासाठी दररोज दहा तास सुरू ठेवण्यात येणार आहे. मंदिरात जेष्ठ नागरिक, दहा वर्षाखालील बालके यांना सद्यस्थितीत दर्शनासाठी मनाई आहे. दर्शन रांगेत सोशल डिस्टनचा वापर करण्यासाठी अंतराने गोल रिंगण करण्यात आले आहेत. 

तसेच हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराज यांचे मंदिर देखील आज सकाळी साडेपाच वाजता उघडण्यात आले येथेही सकाळी आरती करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. सोशल डिस्टनचा वापर, मास्क भाविकासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Aundha Nagnath's door opened Har, Har Mahadev's alarm hingoli news