हिंगोली : जिल्ह्यात सरासरी ८२.२३ टक्के मतदान, सोमवारी मतमोजणी

राजेश दारव्हेकर
Saturday, 16 January 2021

जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीत बिनविरोध ग्रामपंचायत होण्यापूर्वी  ४०४१ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक विभागाकडे सादर केले होते

हिंगोली : जिल्ह्यात ४२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी  (ता. १५ ) मतदान प्रक्रिया सकाळी ७.३० ते साडेपाच पर्यंत घेण्यात आली.  ७.३० ते साडेपाच वाजेपर्यन्तच्या प्रशासनाच्या अंतिम आकडेवारी नुसार सरासरी ८२.२३ टक्के मतदान झाले असून अंतिम आकडेवारी रात्री उशिरा प्राप्त झाली आहे.

जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीत बिनविरोध ग्रामपंचायत होण्यापूर्वी ४०४१ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक विभागाकडे सादर केले होते. मात्र ४९५ ग्रामपंचायती पैकी ७३ ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने ४२२ ग्रापसाठी ४०४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यापैकी ८१४ उमेदवार बिनविरोध आल्याने ३, २०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दरम्यान, शुक्रवारी १ हजार २७६  मतदान केंद्रावर  मतदान निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

हेही वाचा परभणी जिल्ह्यातील कुपटा येथील कोंबड्यांचा मृत्यु ‘बर्ड फ्लू’ मूळेच

ग्रामपंचायत सर्वांत्रिक निवडणुका या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या असून, त्यासाठी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी यांनी आपल्या विभागात मतदान प्रक्रियेचे नियोजन केले होते. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, मतदान यंत्र वाहून नेण्यासाठी गाड्यांची व्यवस्था पोलीस बंदोबस्त अशी चोख तयारी केल्याने मतदान दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. केवळ एक दोन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही वेळ दुसरी यंत्रणा बसविण्याचा प्रकार वगळता सगळीकडे शांततेत मतदान झाले.

हिंगोली तालुक्यात ७८ ग्रामसाठी शुक्रवारी एकूण ८२ हजार ३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून याची टक्केवारी ८२. १७ एवढी आहे. तसेच कळमनुरी तालुक्यात ९० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  ९५ हजार २९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ज्याची टक्केवारी ८०. १७ एवढी आहे. सेनगाव तालुक्यातील ८१ ग्रामपंचायत साठी  ९२ हजार ९७७ मतदारांनी मतदान केले  टक्केवारी ८१. ६४ एवढी आहे. तर औंढा नागनाथ तालुक्यातील ७१  ग्रामपंचायतसाठी ७४ हजार ५७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्याची टक्केवारी ८१. ४१  एवढी आहे.याशिवाय वसमत तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  एकूण एक लाख १२ हजार ५५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ज्याची टक्केवारी ८५. ६४ एवढी आहे. जिल्ह्यात  पाच लाख ५५ हजार ६५५ मतदारापैकी चार  लाख ५७ हजार २३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सरासरी टक्केवारी ८२. २३ एवढी आहे. सर्वाधिक मतदान वसमत तालुक्यात झाले असून तर सर्वात कमी मतदान कळमनुरी तालुक्यात झाल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते.

मतदान प्रक्रिये दरम्यान जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली तालुक्यातील बळसोंड (अंतुलेनगर) , कारवाडी, तर कळमनुरी तालुक्यातील हातमाली कळमकोंडा, सोडेगाव, उमरा, शिवणी या मतदान केंद्राला भेटी देऊन मतदान केंद्रध्यक्षांना सूचना दिल्या. कळमनुरी तालुक्यातील वरुड येथे शेवटच्या टप्प्यात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याने येथे उशिरापर्यंत मतदान सुरू होते तर अंतिम आकडेवारी रात्री उशीरा प्राप्त झाली.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Average turnout in the district is 82.23 per cent, counting of votes on Monday hingoli news