esakal | हिंगोली : असोलवाडी येथील कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याचा अहवाल प्राप्त, कळमनुरी तालुक्यात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कळमनूरी शहरालगत असलेल्या असोलवाडी येथे शुक्रवार (ता. १२) फेब्रुवारी रोजी गावातील अल्पभुधारक तरुण शेतकऱ्यांनी उभारलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील तीनशे कोंबड्या दगावल्या होत्या.

हिंगोली : असोलवाडी येथील कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याचा अहवाल प्राप्त, कळमनुरी तालुक्यात खळबळ

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : असोलवाडी येथील तीनशे कोंबड्या दगावल्या प्रकरणी भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला असून या कोंबड्या बर्ड फ्लू आजारामुळे दगावल्याचे निदान करण्यात आले आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून शनिवार (ता. २०) या गावातील कुकुट पक्षांना दयामरण देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कळमनूरी शहरालगत असलेल्या असोलवाडी येथे शुक्रवार (ता. १२) फेब्रुवारी रोजी गावातील अल्पभुधारक तरुण शेतकऱ्यांनी उभारलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील तीनशे कोंबड्या दगावल्या होत्या. याप्रकरणी पशुसंवर्धन विभागाने घटनास्थळी भेट देऊन दगावलेल्या कोंबड्यांचे शवविच्छेदन करून आजाराचे निदान करण्यासाठी काही नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने गावांमध्ये सर्वेक्षण करुन कुकुट पक्ष्यांच्या नोंदी घेत पक्षी मालकांना स्वच्छता विषयक मार्गदर्शन केले होते.

दरम्यान अज्ञात आजाराने दगावलेल्या कोंबड्यांचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेकडून गुरुवार (ता. १८) ला सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून दगावलेल्या तीनशे कोंबड्या बर्ड फ्लू आजारामुळे दगावल्या असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली आहे. बर्ड फ्लू आजाराची निदान झाल्यामुळे गावामध्ये असलेल्या कुकुट पक्षांना नष्ट करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्याअनुषंगाने आता पशुसंवर्धन विभागा अंतर्गत पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व परिचर यांच्यासह वीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पाच पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान शनिवारी पशुसंवर्धन विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या पाच पथकाकडून असोलवाडी गावाला भेट देऊन गावांमधील सर्व कुकुट पक्षांना दयामरण देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. माधव आठवले यांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाल कांबळे