हिंगोली : खून झालेल्या युवकाच्या पत्नीचा मृतदेह आढळला, शहरात खळबळ

राजेश दारव्हेकर
Monday, 23 November 2020

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निकिता मधुकर लोणकर ( २० ) असे मयताचे नाव आहे . मयताचा पती वैभव जयचंद वाठोरे ( २१ ) राहणार  शिंदेफळ ता . जि . हिंगोली , हल्ली मुक्काम  कमलानगर याच्याशी तिचा १७ जून २०१९ रोजी प्रेमविवाह झाला होता.

हिंगोली : शहरातील  कमलानगर भागात राहणाऱ्या २१ वर्षीय युवकाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याच युवकाच्या पत्नीचा रविवारी (ता. २२) गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निकिता मधुकर लोणकर ( २० ) असे मयताचे नाव आहे . मयताचा पती वैभव जयचंद वाठोरे ( २१ ) राहणार  शिंदेफळ ता . जि . हिंगोली , हल्ली मुक्काम  कमलानगर याच्याशी तिचा १७ जून २०१९ रोजी प्रेमविवाह झाला होता. या प्रेम प्रकरणातून वैभववर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. दरम्यान वैभव वाठोरे याचा दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री खून झाला होता . दोन नोव्हेंबर २०२० रोजी नर्सी नामदेव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चांगेफळ येथील हरिश्चंद्र शिंदे यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत खूनाचा गुन्हा नरसी नामदेव पोलिस ठाण्यात दाखल झाला होता .

तर रविवारी दुपारी ४ वाजता पत्नी निकिता हिचा मृतदेह देऊळगाव रामा येथे शेत शिवारात लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला . पतीच्या खुनानंतर एका महिन्याच्या आतच पत्नीचा मृतदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी याबाबत,अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रकरणाचा तपास झाल्यावर तिने आत्महत्या केली की तिचा खून झाला हे स्पष्ट होणार आहे .

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Body of murdered youth's wife found, commotion in the city hingoli news