Hingoli Breaking ः एक महिला पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या १६० 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

हिंगोली तालुक्यातील ३० वर्षीय महिला मुंबई येथून परतली होती. तिला आयसोलेशन वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले होते. सदरिल महिलेचा घेतलेला स्वॅब अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. 

हिंगोली ः हिंगोली तालुक्यातील एक महिला पॉझिटिव्ह आढळल्याचा अहवाल सोमवारी (ता.२५) रात्री नऊ वाजता प्राप्त झाला. यामुळे एकूण पॉझिटिव्हची संख्या १६० वर पोहचली आहे. 

हिंगोली तालुक्यातील ३० वर्षीय महिला मुंबई येथून परतली होती. तिला आयसोलेशन वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले होते. सदरिल महिलेचा घेतलेला स्वॅब अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. रविवारी रात्री उशिरा कळमनुरी तालुक्यातील पाच गावात आठ बाधित रुग्ण सापडले होते. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी एका रुग्णाची भर पडली. सध्या ७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर ९० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. 

हेही वाचा - वृक्षलागवडीला एक वर्ष ; व्हॉट्सअप ग्रुपने जगविली पंधराशे झाडे

आदेशाचे उल्‍लंघन केल्याबद्दल एकावर गुन्हा
आखाडा बाळापूर ः बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नरवाडी येथे देविदास शामराव माहुरे हा पुणे येथून (ता.१६) मे रोजी आला होता. त्याला घरीच थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, रविवारी (ता. २४) त्याने घरातून पलायन केले. याप्रकरणी पोलिस पाटील लक्ष्मण माहुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

हेही वाचा - घरोघरी नमाज अदा; ‘कोरोना’मुक्‍तीसाठी दुआ...

चाफनाथ येथील दहा जण क्‍वारंटाइन
कळमनुरी ः तालुक्यातील चाफनाथ येथील कोरोनाबाधित झालेले तीन रुग्ण आढळून आल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना कळमनुरी येथे सोमवारी (ता. २५) क्‍वारंटाइन केले आहे. मुंबई येथे कामासाठी स्थलांतर करणाऱ्या चाफनाथ येथील चार नागरिक मुंबई येथून मंगळवार (ता. १९) गावी परत आले. त्‍यांना शाळेतील विलगीकरण कक्षामध्ये थांबण्यास नकार दिला होता. यात दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी या प्रकाराची माहिती आरोग्य व पोलिस प्रशासनाला दिली होती. त्‍यानंतर अधिकारी, कर्मचारी गावात पोचले होते, त्यांनी या नागरिकांच्या अडचणी समजून घेत पोलिस प्रशासनाने सतर्कता दाखवून या नागरिकांना गावांमधील शाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाऐवजी कळमनुरी येथील क्‍वारंटाइन सेंटरमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. कळमनुरी येथे आल्यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यात चारपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चाफनाथ गावात खळबळ उडाली. दरम्यान, मुंबईहून आलेल्या या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या गावातील त्यांचे कुटुंबीय व इतर दहा जणांना आरोग्य विभागाने सोमवारी क्‍वारंटाइन सेंटरला हलविले आहे. शाळेतील विलगीकरण कक्षामध्ये राहण्यास नकार दिल्यानंतर या नागरिकांना समजून सांगण्यासाठी कळमनुरी येथून तीन सामाजिक कार्यकर्तेही भेटावयास गेल्याची माहिती हाती आली आहे. 

कोरोना मीटर 
एकूण पॉझिटिव्ह - १६०
उपचार घेऊन घरी परतलेले - ९० 
उपचार सुरु - ७० 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli Breaking: One woman positive, 160 patients, hingoli news