हिंगोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील लिपीकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

राजेश दारव्हेकर
Wednesday, 25 November 2020

याबाबत अधिक माहिती अशी की , शासकिय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे एकूण एक लाख ४२ हजार ६६० रुपयांचे दोन वैद्यकिय देयक मंजूर झाले होते. सदर देयक तयार करून कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी कार्यालयातील लिपीक विनायक देशपांडे याने ११ हजार रुपयांची लाच मागितली. 

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे वैद्यकिय देयक तयार करून  कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतांना रुग्णालयातील लिपीक विनायक देशपांडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २५) रुग्णालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शासकिय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे एकूण एक लाख ४२ हजार ६६० रुपयांचे दोन वैद्यकिय देयक मंजूर झाले होते. सदर देयक तयार करून कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी कार्यालयातील लिपीक विनायक देशपांडे याने ११ हजार रुपयांची लाच मागितली. 

ही रक्कम बुधवारी सामान्य रुग्णालयात आणून देण्याचे ठरले होते. या प्रकरणात संबंधीत रुग्णसेवकाने  लाचलुचपत प्रतिब तक्रार दाखल केली होता. त्यानुसार पडताळणी करण्यात आली.

पडताळणी झाल्यानंतर बुधवारी लाचलुचपतचे प्रभारी उपाधिक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुने, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, रुद्रा कबाडे, संतोष दुमाने, अवी किर्तनकार, ज्ञानेश्वर पंचेलिंगे यांच्या पथकाने दुपारी एक वाजता रुग्णालय परिसरात सापळा रचला होता. दरम्यान दुपारी तक्रारदार शासकिय रुग्णालयात गेल्यानंतर लिपीक विनायक देशपांडे याने ११ हजाराची लाच घेताच लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: The clerk of the district general hospital was caught red-handed taking bribe hingoli news