
हिंगोली : गतवर्षीच्या पीकविण्यासाठी त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन
हिंगोली : गतवर्षीचा खरिपाचा पीक विमा आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्ह्यातील एकूण १५७ शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे पीक विम्याचे अर्ज त्रुटींमुळे परत आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगाम- २०२१ साठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले होते. तर, बहुतांश शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पीक विमा दाखल केला होता. नंतर अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही ठिकाणी कंपनीच्या वतीने सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने सर्व पीक विमा धारकांचे विमा दावे मंजूर करण्यात आले आहेत. आता पीक विम्याचा लाभ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असतानाच मागील वर्षी भरण्यात आलेल्या अर्जांपैकी १५७ शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे परत आले आहेत. सदरील अर्ज त्या- त्या आपले सरकार सेवा केंद्राच्या आयडीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र चालकांनी सदरील शेतकऱ्यांचे रिव्हर्ट आलेले अर्ज कागदपत्र अपलोड करून पुन्हा दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
परत आलेल्या अर्जांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांची नावे सातबारावर असलेल्या नावात तफावत असते, नाव न जुळणे, बँक खात्याची माहिती न जुळणे अशा विविध कारणांमुळे हे अर्ज त्या- त्या सीएससी केंद्राकडे परत पाठविण्यात आले आहेत. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत सदरील अर्ज पुन्हा कागदपत्र अपलोड करून दाखल करावे लागणार आहेत. त्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. अर्ज परत आलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड न केल्यास सदरील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Hingoli Crop Insurance Appeal Make Shortcomings
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..