
विक्रेत्यांना लाभ होत असुन थंडीच्या प्रतिक्षेत असलेले व्यापारी समाधानी झाले आहेत. शहरात जवळपास शंभर क्विंटल सुकामेवा उपलब्ध असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
हिंगोली : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढला असुन तापमान दहा अंशावर आले आहे. यामुळे सुकामेव्याला चांगली मागणी वाढल्याने त्याचा विक्रेत्यांना लाभ होत असुन थंडीच्या प्रतिक्षेत असलेले व्यापारी समाधानी झाले आहेत. शहरात जवळपास शंभर क्विंटल सुकामेवा उपलब्ध असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
दिवाळीपासुन थंडीला सुरुवात होते. यावर्षी मात्र थंडीला उशिराने सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी वातावरण उष्ण होते. थंडीचा हा अंदाज बाधून शहरातील सुकामेवा विक्रेत्यांनी पैशांची गुंतवणूक करून सुमारे १०० क्विंटल माल आणला ; मात्र यंदा दिवाळी संपून पंधरवडा लोटत आला; तरी थंडी न पडल्याने सुकामेव्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. दरम्यान, मागील वर्षीच्या सिझनमध्ये थंडी जास्त असल्याने शहरात ऐशी ते नव्वद क्विंटल सुकामेव्याची विक्री झाली होती . हिवाळ्यात सुकामेव्याचा वापर आरोग्य पोषक मानला जातो. त्यामुळे या ऋतूत सुकामेव्याची खरेदी केली जाते. सुकामेवा पोषक व पचनासही चांगला असल्याने त्याचा वापर अन्य ऋतूंपेक्षा हिवाळ्यात अधिक केला जातो. त्यामुळे दरवर्षी हिवाळ्याच्या सुरवातीला सुकामेवा विक्रीस उपलब्ध असतो. शहरात शंभरावर किराणा दुकाने आहेत. तर यातील पन्नास दुकाने होलसेलची आहेत. यासह रस्त्यावर सुकामेव्याचे स्टॉल लावून बसणारे पंचवीस ते तीस विक्रेते आहेत. सुकामेवा पॅकिंगमध्ये येतो. यात खारीक एका पोत्यात ऐशी ते नव्वद किलो येते. काजूचे पॅकिंगचे पंधरा किलोंचे डब्बे येतात. बदाम एका कट्टयात तीस किलो तर खोबरे पंधरा किलोच्या पॅकिंगमध्ये उपलव्य होते. गोडंबी दहा किलोंचा पॅक मिळतो तर डिंक सुद्धा पंधरा किलोच्या पॅकिंगमध्ये मिळतो. खारीक सोरा तर खोबऱ्यात राजापुरी निशेस आदी प्रकार बाजारात आले आहेत.पिवळा डिक, काळा डिंक आदी प्रकार विक्रीस असल्याची माहिती साई प्रोव्हीजनचे विक्रेत्यांनी दिली.
हेही वाचा - नांदेडमध्ये नवीन घराच्या बांधकामाला महागाईचे ग्रहण -
यावर्षी अर्धा डिसेंबर महिना संपत आला तरी थंडीचे प्रमाण जाणवत नसल्याने सुकामेव्याची विक्री मंदावली आहे. दररोज दुपारपर्यंतचे तापमान वीस अंशापर्यत राहत होते. त्यामुळे आतापर्यंत एक ते दोन क्विंटल सुकामेव्याची विक्री झाल्याची माहिती श्री . अग्रवाल यांनी दिली. थंडी सुरू झाल्याने सुकामेव्याची विक्री वाढली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
खारीक २०० ते ३५० रुपये किलो, खोबरे १९० ते २३० रुपये किलो, गोडंबी ३०० ते ३५० रुपये किलो, डिंक ३०० ते ४०० रुपये किलो, काजू ७०० ते ७५० किलो, बदाम ५६० ते ७०० रुपये किलो, उमरावती साखर ४५ ते ५० रुपये किलो प्रमाणे विक्रिस उपलब्ध झाली आहे. शहरात हैदराबाद, अकोला, नांदेड या ठिकाणाहून सुकामेवा विक्रिस उपलब्ध होतो.
संपादन- प्रल्हाद कांबळे