Hingoli : जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत उमेदवारांचे भाग्य मशीनबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

Hingoli : जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत उमेदवारांचे भाग्य मशीनबंद

हिंगोली : जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. १८) सकाळी ७.३० पासून मतदान सुरू झाले. सकाळी मतदान केंद्रावर तुरळक मतदार आले होते. त्यानंतर मात्र मतदाराच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव व औंढा नागनाथ तहसील कार्यालयामार्फत मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, कर्मचारी व पोलिसांना मतदान केंद्रावर तैनात होते.

जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायती निवडणूक होऊ घातली आहे. त्यापैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे दुपारी साडेतीन वाजतापर्यंत उर्वरित ६१ गावांमध्ये ६६.३९ टक्के मतदान झाले. यामध्ये ८२ हजार ६१८ पैकी ५४ हजार ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २८ हजार २३७ पुरुष तर २६ हजार ६१५ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ६२ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया घेतली जात आहे. यामध्ये हिंगोली व कळमनुरी तालुक्यातील प्रत्येकी १६ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. वसमत तालुक्यातील १३, सेनगाव तालुक्यातील १० व औंढा नागनाथ तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा समावेश आहे. रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. राज्यातील राजकीय भूकंपानंतर झालेल्या सत्ता बदलात ग्रामीण भागातील ही पहिलीच निवडणूक होत असल्याने अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होणार आहेत. विशेष म्हणजे सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून होत असल्याने सरपंच पदाचा मान पटकाविण्याकरिता अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.

गावातील गटतट आमने-सामने उभे असल्यामुळे कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला होता. मतदान केंद्रासह विविध ठिकाणी पेट्रोलिंग करिता पोलिस कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह तहसीलदार नवनाथ वग्गवाड, अरविंद बोळंगे, सुरेखा नांदे, जीवककुमार कांबळे, डॉ. कानगुले व मतदान प्रक्रियेतील कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

असे होते नियोजन

जिल्ह्यात रविवारी झालेल्या मतदानासाठी १८५ बूथ तयार करण्यात आले होते. ५१० ग्रामपंचायत सदस्यांसाठी ९२४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ६२ सरपंचासाठी १७९ उमेदवार रिंगणात आहेत. दोन सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत; तसेच ९७ सदस्य बिनविरोध आले आहेत. २०७ मतदान केंद्राधिकारी, अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.