हिंगोली : दुष्काळी अनुदानासाठी तलाठ्याने खाते क्रमांक न टाकल्याने शेतकरी संतप्त 

सय्यद अतिक
Thursday, 4 February 2021

कुपटी हे गाव पूर्वी बाळापुर सज्जामध्ये येत होते. परंतु महसूल विभागाने नवीन सज्जाची निर्मिती केल्याने हे गाव डोंगरगाव पुल सज्जामध्ये समाविष्ट झाल्याने त्याचा कार्यभार डोंगरगाव पूल सज्जात गेला आहे.

आखाडा बाळापूर ( जिल्हा परभणी ) :  कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल सज्जाच्या तलाठ्याने कुपटी गावातील अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक न टाकल्याने दुष्काळी अनुदान आलेल्या शेतकऱ्यांना पैसे उचलण्यासाठी बँकेत चकरा माराव्या लागत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे.

कुपटी हे गाव पूर्वी बाळापुर सज्जामध्ये येत होते. परंतु महसूल विभागाने नवीन सज्जाची निर्मिती केल्याने हे गाव डोंगरगाव पुल सज्जामध्ये समाविष्ट झाल्याने त्याचा कार्यभार डोंगरगाव पूल सज्जात गेला आहे. या वर्षी दुष्काळ झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांचे खात्यात थेट रक्कम जमा व्हावी व हेक्टरी दहा हजार रुपये व दोन हेक्टरला विस हजार रुपये दोन टप्प्यांत मिळणार होते. याकरिता शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे बँक खाते क्रमांक दिले होते. परंतु संबंधित तलाठ्याने नवीन गाव आलेल्या शेतकऱ्यांचे एकाही बँकेचे खाते क्रमांक न टाकता अनुदान यादी बँकेला दिली. सध्या शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थेट खात्यात जमा होऊ शकले नाही. मध्यवर्ती बँकेमध्ये गुरुवारी शेतकरी बँकेत येऊन आपल्या खात्याची चौकशी केली असता दुष्काळी अनुदान एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा न झाल्याने अनेक शेतकरी संतप्त झाले होते.

कामचुकार तलाठ्याच्या विरोधात संताप

या वेळी बँकेचे शाखाधिकारी श्री. मुदाफळे यांनी यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना जमा पावती भरुन दोन दिवसानंतर रक्कम अदा करण्यात येईल असे सांगून शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे. परंतु बँकेत गाव लागूनही तलाठ्याच्या दुर्लक्षाने सदरील शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक न टाकल्याने दुष्काळी अनुदान थेट खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांना दोन दिवस बँकेत चकरा मारण्याची वेळ आली आहे. यामुळे सदरील तलाठ्याविरुद्ध शेतकऱ्यामधून रोष व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Farmers angry over Talatha's failure to provide account number for drought relief nanded news