हिंगोली : जिल्ह्यात खरीप पिकांची अंतीम पैसेवारी ४८.३५ टक्के

राजेश दारव्हेकर
Thursday, 17 December 2020

हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतीचे चांगले उत्पादन होईल अशी जपेक्षा शेतकऱ्यांना होती ; परंतु काही ठिकाणी बियाणातील दोषामुळे  सोयाबीनची दुबार  तर काही ठिकाणी तिबारही पेरणी करावी लागली .

हिंगोली : जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असुन  एकत्रित पैसेवारी ४८. ३५ पैसे एवढी आली. प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी अंतीम पैसेवारी जाहीर केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतीचे चांगले उत्पादन होईल अशी जपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु काही ठिकाणी बियाणातील दोषामुळे सोयाबीनची दुबार तर काही ठिकाणी तिबारही पेरणी करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अशा परिस्थितीमुळे यंदा चांगले उत्पादन येईल, अशी आशाही काहीशी मावळली होती. खरीप हंगामामधील मुग, उडीदाच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे ही पीके हाती आली नाही. सदरील पिकाचे उत्पादन हेक्टरी ५० ते ६० किलो झाल्याचा अंदाज आहे. 

हेही वाचा नांदेड : कौडगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्या 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल -

हिंगोली जिल्ह्यात खरीपात ४.०२ लाख हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असताना प्रत्यक्षात मात्र ३. ८४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यात सर्वात जात २. ६० लाख हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली होती. सहा हजार ६२० हेक्टरवर उडीद, आठ हजार ३८८ हेक्टरवर मुग तर तुरीची ४४ हजार ६३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाची लागवड ३८ हजार ७९८ हेक्टरवर झाली आहे.

जिल्ह्यात पेरणीनंतर सतत पाऊस झाल्यामुळे त्याचा पिकांवर विपरीत परिणाम झाला. त्यातच पिकांचे मोठे नुकसानही झाले. परिणामी सोयाबीनचा उतारा एकरी दोन ते तीन क्विंटल आला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी केलेल्या लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. मागील सहा वर्षात प्रथमच १२४ मीली पाऊस जिल्हाभरात झाला आहे. त्यानंतर प्रशासनाने सप्टेंबर अखेर ६४.५९ पैसे हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. त्यानंतर सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना आँक्टोबर अखेर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सुधारित पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यात एकत्रित सुधारित पैसेवारी ४८.३५ पैसे  एवढी आली आहे. 

जिल्ह्यात तालुकानिहाय पैसेवारी पुढील प्रमाणे कळमनुरी तालुक्यातील १४८ गावातील पैसेवारी ४८.४३ पैसे, वसमत तालुक्यातील १५२ गावातील पैसेवारी ४८ पैसे, औंढा नागनाथ तालुक्यातील १२२ गावातील पैसेवारी १४९ .१७ पैसे तर हिंगोली तालुक्यातील १५२ गावाची पैसेवारी ४८.२९ पैसे, सेनगाव तालुक्यातील १३३ गावातील पैसेवारी ४७.८८ पैसे जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ७०७ गावातील अंतीम पैसेवारी ४८.३५ पैसे जाहीर झाली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: The final percentage of kharif crops in the district is 48.35 percent hingoli news