Hingoli : सुनेविरुद्ध सासूने मारली बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल

Hingoli : सुनेविरुद्ध सासूने मारली बाजी

सेनगाव : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला असून, हाताळा ग्रामपंचायतीमध्ये सुनेविरुध्द सासूने बाजी मारली. तर, सुकळीमध्ये भाजपच्या तालुका अध्यक्षाचा पराभव झाल्याचा पहायला मिळाला.

सध्या १० ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडून मंगळवारी (ता.२०) निकाल जाहीर करण्यात आला. सेनगाव येथील तहसील कार्यालयात दहा ग्रामपंचायतींसाठी एकूण सहा टेबलवर पाच फेऱ्यांमध्ये हा निकाल स्पष्ट करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील कहाकर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाच्या माजी पं.स. सभापती शारदाताई संतोष पोपळघट ह्या विजयी झाल्या आहेत. तर, सुकळी बुद्रूक येथे भाजपच्या तालुकाध्यक्षाचा पराभव होऊन या ठिकाणी सुद्धा ठाकरे गटातील शिवसेनेचे सतीश पाचपिल्ले यांचा विजय झाला आहे.

हाताळा ग्रामपंचायतीमध्ये सासू विरुद्ध सुनेत लढत पहायला मिळाली. मागच्या दहा वर्षांपासून या ठिकाणी सुनेची सत्ता होती. मात्र, यावेळी सासूने बाजी मारल्यामुळे पुढचे पाच वर्षे सासूकडे आल्याचे पहायला मिळाले. तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाच ग्रामपंचायती तर भाजपकडे एक, काँग्रेसकडे एक तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आणि इतर दोन असा निकाल स्पष्ट झाला आहे. काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून, अनेक ठिकाणी बड्या नेत्यांच्या हातची सत्ता गेल्यामुळे कही खुशी, कही गम असे वातावरण पहायला मिळाले. तहसील कार्यालयासमोर पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.