हिंगोली : ट्रकमधील लोखंडी एंगलने घेतला दोघांचा बळी

चंद्रमुनी बलखंडे, मुजाहेद सिद्दीकी
Thursday, 26 November 2020

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी नांदेड ते हिंगोली महामार्गावरून एम पी ०८ एच एफ ७७४४ क्रमांकाचा ट्रक जात होता. हा ट्रक बाळापूर पासून जवळच असलेल्या दाती पाटी परिसरात आला असता चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. 

आखाडा बाळापूर / वारंगाफाटा (जिल्हा हिंगोली ) : ट्रकवरील चालकाचे  नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड ते हिंगोली महामार्गावरील दाती पाटी परिसरात गुरुवार  (ता. २६ ) सकाळच्या सुमारास घडली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी नांदेड ते हिंगोली महामार्गावरून (एम पी ०८ एच एफ ७७४४) क्रमांकाचा ट्रक जात होता. हा ट्रक बाळापूरपासून जवळच असलेल्या दाती पाटी परिसरात आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूला काही अंतरावर खाली गेला. यात ट्रकमधील लोखंडी एंगल ट्रकच्या कॅबिनवर धडकले. एकाचवेळी एंगल धडकल्याने केबिन तूटून समोरील शेतात पडले. लोखंडी एंगलसोबत चालक व क्लीनरही केबिन तोडून बाहेर पडल्याने त्यांना जोराचा मार बसला व  त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा -  पुण्यातील कंपनीने घातला नांदेडच्या डॉक्टरला अडीच लाखांचा गंडा -

घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, पोलिस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, हनुमंत नखाते यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात घटना स्थळाची पाहणी करत मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह आखाडा बाळापूर आरोग्य केंद्रात दाखल केले असून घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाजूला पडलेले दिसल्यानंतर मृतदेह आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी काही प्रवाशी नागरिकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन करताच अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या नागरिकांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. त्यामुळे श्री हुंडेकर, श्री मुपडे यांनीच मृतदेह उचलण्यास सुरवात केली. पोलिसच मृतदेह उचलत असल्याचे पाहून शेवटी काही नागरिकांनी हातभार लावत पोलिसांना मदत केली. 

ऊसतोड कामगार थोडक्यात बचावले

अपघात घटनास्थळापासून काही फूट अंतरावर ऊसतोड कामगारांच्या झोपड्या होत्या. या झोपड्यापासून काही फूट अंतरावर ट्रकचा अपघात झाला. थोडा अगोदर ट्रक रस्त्याच्या खाली गेला असता तर ऊसतोड कामगारांच्या झोपड्यावर गेला असता. मात्र दैव बलवत्तर म्हणून ऊसतोड कामगार थोडक्यात बचावले.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: The iron angle in the truck claimed the lives of both hingoli news