
Hingoli : महावितरणचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद
हिंगोली : शहर व ग्रामीण हद्दीतील वीज वितरण कंपनीचे साहित्य चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे.हिंगोली एमआयडीसी परीसरातील एक नोव्हेंबर रोजी २२० केव्ही उपकेंद्र (लिंबाळा मक्ता) येथील कार्यालयाच्या प्रांगणातून विद्युत विभागाचे विविध उपकरणे व धातूचे साहित्य चोरी गेल्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेच २९ नोव्हेंबर रोजी १३२ केव्ही विद्युत उपकेंद्र (हिंगोली) येथून विद्युत विभागाचे विविध उपकरणे व धातूचे साहित्य चोरी बाबतही शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस निरिक्षक उदय खंडेराय यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकास माहिती मिळाली होती. यानुसार पथकाने लिंबाळा मक्ता एमआयडीसी परीसरातील करण पवार, विजय काळे यास ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी संजय ऊर्फ काल्या पंडित काळे, मुस्तकिन शेख शबाना यांच्या सोबत मिळून दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर संशयित आरोपींवर यापूर्वीचे अनेक चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असून, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही कार्यवाही सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, सुनील गोपीनवार व पोलिस अंमलदार गजानन पोकळे, संभाजी लकुळे, लिंबाजी वाव्हळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, जावेद शेख, प्रशांत वाघमारे, इरफान पठाण व रोहित मुदीराज यांनी केली.