
वापटीत भिंत कोसळली कळमनुरी, औंढा तालुक्यातील काही गावाचा समावेश
हिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात शनिवारी (ता. ३०) दुपारी ३. २५ व ४. १० वाजता एका पाठोपाठ दोन वेळेस जमीनीतुन गुढ आवाज आला. हा आवाज कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावात आला आहे. या हादऱ्याने वापटी गावात भिंत कोसळली आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमीनीतुन गुढ आवाज येत आहेत. आतापर्यंत शंभर वेळा हे आवाज आले आहेत. एक ते दोन वेळेस या गावात भुकंपाचा सौम्य धक्का बसल्याची रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. या बाबत गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी कळविले आहे. एकदा येथे स्वारातीम विद्यापीठ नांदेड येथील तज्ञांनी भेट देऊन पाहणी केली मात्र आवाजाचे गुढ उकलले नाही. रात्री बेरात्री होणाऱ्या या आवाजाने गावकरी भयभीत झाले आहेत.
दरम्यान, या गावात आवाज आल्यावर कळमनुरी व औंढा तालुक्यातील काही गावात आवाज येत आहेत. शनिवारी दुपारी ३. २५ व ४. १० असे दोन वेळेस आवाज झाले. यामुळे घरातील गावकरी रस्त्यावर आले होते. गावात कोठे काही झाले का याची विचारपुस एकमेकांना करीत होते. मात्र पांगरा गावात काही नुकसान झाले नाही.
परंतु या आवाजाने याच तालुक्यातील वापटी गावात श्री. तवर यांच्या घराची भिंत कोसळली आहे. तर हा गुढ आवाज वापटीसह कुपटी शिरली, खापरखेडा, खांबाळा तसेच औंढा तालुक्यातील आमदार परिसरात झाल्याचे गावकरी सांगत आहेत तसेच कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, पोतरा आदी गावात देखील हा आवाज आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. याची प्रशासनाने दखल घेऊन आवाजाचे गुढ उकलावे अशी मागणी होत आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे