
मागील खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्हात शेतीचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सुद्धा निसर्गगाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला होता
हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षातील अतिवृष्टी नुकसान भरपाईची दुसऱ्या हप्त्याची रक्कम ११५ कोटी ९८ लक्ष १२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले असून ही रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
मागील खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्हात शेतीचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सुद्धा निसर्गगाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला होता. शेतकरी दरवर्षी एक तर अस्मानी संकटाने नाहीतर सुलतानी म्हणजे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हवालदिल होत असतो मागील खरीप हंगामात निसर्गाचा लहरीपणा शेतकरयांना चांगलाच भोवला सोयाबीन, तूर. कापूस, यासह हळद, केळी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . खासदार हेमंत पाटील यांनी दौरा करून पाहणी केली होती. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना करून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांनतर लगेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम देण्यात आली होती.
हेही वाचा - हिंगोलीत कोरोना लसीची रंगीत तालिम पुर्ण
त्यांनतर उर्वरित दुसरा हप्ता न मिळाल्याने मतदार संघातून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी गेल्यांनतर खासदार पाटील यांनी उर्वरित आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील ११५ कोटी ९८ लक्ष १२ हजार रुपये राज्य शासनाने तातडीने मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडे दुसऱ्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे