
हिंगोली : सौर योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवे संदेश
हिंगोली : प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौरपंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. या संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.
महाऊर्जा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशांबद्दल सायबर सेलमध्ये तक्रारी केल्या आहेत. त्यात काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा करण्यास सांगितले जात आहे. अशा खोट्या संकेतस्थळासह मोबाईल ॲपला प्रतिसाद देऊ नका, तसेच फसव्या दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीवरील प्रलोभनाला बळी पडू नका, अशा संकेतस्थळावर, ॲपवर ऑनलाइन पद्धतीने पैसे भरू नका, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री कुसुम योजना शासनाच्या महाऊर्जा विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाइन नोंदणीसाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावरच भेट द्यावी. अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, औरंगाबाद ई-मेल domedaabad@mahaurja.com येथे संपर्क साधावा, असे आवाहनही रोडे यांनी केले आहे.
Web Title: Hingoli Solar Scheme Deceptive Message Farmers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..