
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार चाईल्ड लाईन व पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे सलग तीन बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील इंजनगाव व हिंगोली तालुक्यातील पेडगाववाडी, लोहगाव येथील अल्पवयीन मुलीचे बाल विवाह लावून दिले जात असल्याची तक्रार चाईल्ड लाईनला व पोलीस प्रशासनास मिळाली असता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार चाईल्ड लाईन व पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे सलग तीन बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.
तुळशी विवाहानंतर लग्न सराईला वेग आला असून जिल्ह्यामध्ये एकाच आठवड्यात तीन बाल विवाहाचे नियोजन झाले होते. सदर बाल विवाह होत असल्याची चाहुल चाईल्ड लाईन मार्फत लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा व परिविक्षा कक्षातील अधिकारी ॲड.अनुराधा पंडीत, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण तर पोलीस प्रशासन व चाईल्ड लाईन यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील इंजनगाव, पेडगाववाडी व लोहगाव गावातील ग्रामबाल संरक्षण समितीच्या मदतीने बालविवाह रोखण्यात आले.
हेही वाचा - आजपासून अजंता एक्स्प्रेस सुरु, पूर्णा-पटना आणि हैदराबाद - जयपूर विशेष रेल्वेला मुदतवाढ
बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यात एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बाल विवाहाच्या दुष्परिणामाविषयी समुपदेशन करण्यात आले. ग्राम बाल संरक्षण समिती समक्ष लेखी जबाब लिहुन घेवून बाल विवाह रोखण्यात आले, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती कोरडे यांनी दिली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे