
क्रुझर गाडीला अचानक आग लागल्यामुळे बुधवार (ता. ३०) ला पंचायत समिती कार्यालयासमोर मोठी धावपळ उडाली. पोलिस व नागरिकांनी वेळीच दक्षता दाखवत गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली.
कळमनुरी (जिल्हा हिंगोली ) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवार व कार्यकर्त्यांना घेऊन आलेल्या क्रुझर गाडीला अचानक आग लागल्यामुळे बुधवार (ता. ३०) ला पंचायत समिती कार्यालयासमोर मोठी धावपळ उडाली. पोलिस व नागरिकांनी वेळीच दक्षता दाखवत गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालय व परिसरात मोठ्याप्रमाणावर संभाव्य उमेदवार व त्यांच्या पाठीराखे कार्यकर्त्यांनी वाहने घेऊन बुधवारी तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती. दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास (एमएच २९- एडी ०४२०) या क्रुझर जीपमधून उमेदवार व त्यांचे पाठीराखे कार्यकर्ते कळमनुरी शहरात दाखल झाले. आपले वाहन लावण्याकरता त्यांनी जागेचा शोध चालविला असतानाच पंचायत समिती कार्यालयासमोर अचानकपणे जीपच्या बोनेटमधून धुराचा मोठा लोळ उठला.
हेही वाचा - हिंगोलीच्या सनी पंडितची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
गाडीला आग लागण्याचे समजताच गाडी चालकाने गाडी थांबवली. गाडीमधील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तातडीने गाडीबाहेर उड्या घेतल्या. हा प्रकार घडल्यानंतर गर्दी नियंत्रणासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, कर्मचारी श्री. राठोड, श्री जगताप, गृहरक्षक दलाचे जवान अजय वर्मा, केशव संगेकर यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तातडीने आग लागलेल्या क्रुझर गाडीच्या बोनेटवर पाण्याचा व मातीचा वापर करुन आग आटोक्यात आणली.
संपादन- प्रल्हाद कांबळे