esakal | धक्कादायक - चोरट्यांनी वृध्द महिलेचे दागिने लंपास केले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

मनकर्नाबाई  सरुळे

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथे सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पाऊस सुरु असताना एक वयोवृद्ध महिला घरात झोपली असता चोरट्यांनी तिच्या अंगावरील सोने व चांदीचे दागिने लंपास करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरड करून परिसरातील नागरिकांना जागे करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्या महिलेच्या डोक्यात जबर मारहाण करून हत्या केली.

धक्कादायक - चोरट्यांनी वृध्द महिलेचे दागिने लंपास केले अन्...

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास एका ७० वर्षीय महिलेची हत्या करून अंगावरील दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.दहा) मध्यरात्री घडली आहे. 

साखरा येथे सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पाऊस सुरु असताना एक वयोवृद्ध महिला घरात झोपली असता चोरट्यांनी तिच्या अंगावरील सोने व चांदीचे दागिने लंपास करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरड करून परिसरातील नागरिकांना जागे करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्या महिलेच्या डोक्यात जबर मारहाण करून हत्या केली. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडून त्या महिलेचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. 

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
 
मनकर्नाबाई तुळशीराम सरुळे (वय ७०) असे या महिलेचे नाव आहे. तिला एक मुलगा असून तो रिसोड येथे राहतो. सदरील महिला ही घरात एकटी राहत होती. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला व महिलेचा खून करून अंगावरील दागिने घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. सकाळी त्या महिलेला परिसरातील नागरिकांनी मृत अवस्थेत पाहिल्याने त्यांनी सेनगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बाबूराव जाधव यांनी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चक्कर आल्याने एका महिलेचा मृत्यु... 

वसमत शहरातील वर्धमान मंगल कार्यालयाच्या पाठमागे राहणाऱ्या एका महिलेला चक्कर आल्याने तिचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता.दहा) घडली असून याबाबत आकस्मित मृत्युची नोंद झाली आहे. वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या सविता राजू काचगुंडे (वय ३२) यांना सोमवारी सायंकाळी अचानक चक्कर आल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ओंकार पोले व इतरांनी त्यांना महिला सामान्य रुग्णालयात दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत ओंकार पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसमत पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली. मृत्युचे कारण काही स्पष्ट झाले नाही. 

पावसाने घराची भिंत कोसळून नुकसान... 
 
सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे सोमवारी (ता.दहा) पावसाने भिंत कोसळून नुकसान झाले आहे. येथे सोमवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरु होती. या वेळी गगपत इंगोले यांच्या घराची पाठीमागील भिंत कोसळली. यामुळे घरातील धान्य, भांडे, संसारोपयोगी साहित्याचे अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत चंद्रभान शिंदे, रुस्तुमा इंगोले, ज्ञानेश्वर शिंदे, उत्तम भंडारे, दिपक पंडित यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाईची मागणी श्री. इंगोले यांनी केली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले