Hingoli News: चंद्रपूर-आंबाजोगाई बसचा हिंगोली ते परभणी मार्गावर अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli News

Hingoli News: चंद्रपूर-आंबाजोगाई बसचा हिंगोली ते परभणी मार्गावर अपघात

हिंगोली : हिंगोली ते परभणी मार्गावर असलेल्या बोरीसावंत जवळ चंद्रपूर ते आंबाजोगाई बसचा मंगळवारी ता.१० सकाळी साडेपाच वाजता अपघात झाला यात २५ ते ३० प्रवासी जखमी हट्टा येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आंबाजोगाई आगाराची चंद्रपूर- आ़ंबाजोगाई बस क्रमांक एमएच-०९- एफएल-१०२० हि बस मंगळवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हिंगोली ते परभणी मार्गावर असलेल्या औंढा ते हट्टा मार्गावर बोरीसावंत जवळ आली असताना समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बसला कट मारला.

यामध्ये ट्रकची बसला धडक बसू नये, व प्रवाशांना वाचविण्यासाठी चालकाने बस बाजूला घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र यामध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.

दरम्यान, रिपाईचे पदाधिकारी किरण घोंगडे यांना ही माहिती कळताच त्यांनी या बाबतची माहिती गावकरी व हट्टा पोलिसांना दिल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार शेषराव लाखाडे, सय्यद खतीब, राजेश ठाकूर, आंबादास बेले यांच्या पथकाने तातडीने

घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बस बाहेर काढले. या अपघातात सुमारे २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत.

यामध्ये बहुतांश प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी वाहनाने हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.