हिंगोली : पूल नसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना काढावी लागते पाण्यातून वाट

राजेश दारव्हेकर
Monday, 21 September 2020

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गावा पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतर असलेल्या काळकोंडी येथील ग्रामस्थांना पुला अभावी पाण्यातून ये-जा करावी लागत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

हिंगोली :  तालुक्यातील काळकोंडी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्याने मागील अनेक वर्षापासून नर्सी या ठिकाणी येण्यासाठी शेतात जाण्यासाठी नदीच्या पाण्यातून मार्ग काढीत मोठ्या कसरतीने वाट काढावी लागत आहे.

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतर असलेल्या काळकोंडी येथील ग्रामस्थांना पुला अभावी पाण्यातून ये-जा करावी लागत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

कयाधू नदी वाहते या नदीवर पूल नसल्यामुळे

काळकोंडी गावाला लागूनच दक्षिण दिशेला कयाधू नदी वाहते या नदीवर पूल नसल्यामुळे नदीला पूर आल्याने काळकोंडी नर्सी या गावाचा अनेक वेळा संपर्क तुटला आहे. काळकोंडी या ठिकाणी जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नर्सी नामदेव या ठिकाणी यावे लागते.

तसेच येथील कयाधू नदी पात्रांमध्ये वर्षातील सात आठ महिने पाणी वाहत असल्याने नर्सी या ठिकाणी येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थ व नर्सी शिवारातील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो.

विद्यार्थ्यी तसेच ग्रामस्थ यांना चिखल तुडवीत यावे लागते

नर्सी ते काळकोंडी हे अंतर कमी असून हे बाजार पेठेचे ठिकाण असल्याने येथील ग्रामस्थ बँक, दवाखाना, बाजार, दूध विक्री, व इतर मालाची व जीवनावश्यक वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी नर्सी या ठिकाणी पूर्वीपासून येतात. परंतु नदीला पाणी जास्त असल्यामुळे त्यांना नाईलाजाने हिंगोलीला जावे लागते. येथील विद्यार्थ्यी तसेच ग्रामस्थ यांना चिखल तुडवीत यावे लागत असल्याने नर्सी येथील गुरुद्वारा पासून ते कयाधू नदी पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता करण्यात आला परंतु नदीवर पूल नसल्यामुळे येथील वयोवृद्ध ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना वर्षातून सात-आठ महिने नदीच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्याचप्रमाणे शेतामध्ये जाण्यासाठी व शेतातील मालाची ने आण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे येथील कयाधू नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

अडचणी दुर करावी अशी मागणी

मागच्या अनेक वर्षांपासून गावकरी कयाधु नदीलर पुल उभारुन गावकऱ्यांची होणारी अडचणी दुर करावी अशी मागणी करीत आहेत मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे याचा त्रास मात्र गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधतानी याकडे लक्ष देऊन कयाधु नदीवर पुल उभारावा अशी मागणी गावकऱ्यांतून केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Villagers and farmers have to wait for water as there is no bridge hingoli news