esakal | हिंगोली जिल्हा परिषदेने दिली ७८ गुरुजींना समुपदेशनद्वारे पदस्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

आंतरजिल्हा बदलीने हिंगोलीत आलेल्या शिक्षकांसाठी चार दिवसांपूर्वी प्रक्रिया सुरु होणार होती. परंतू शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे चार दिवसांपूर्वी ठेवण्यात आलेली ही प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने शिक्षकांचा हिरमोड झाला होता.

हिंगोली जिल्हा परिषदेने दिली ७८ गुरुजींना समुपदेशनद्वारे पदस्थापना

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांना कोरोनाच्या संकटात पदस्थापना देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हिंगोली जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ७८ शिक्षकांना सोमवारी समुपदेशनद्वारे पदस्थापना दिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून होणारी गुरुजींची पायपीट आता थांबली आहे. 

येथील जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहात सोमवारी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसाठी समुपदेशन पद्धतीने पद स्थापना देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के उपस्थित होते.  

हेही वाचा - आमच्याकडे कुणी लक्ष देईल का? ज्येष्ठ नागरिकांचा टाहो

आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना शाळेवर पदस्थापना देण्यासाठी सतत  विलंब होत असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. सतत हे शिक्षक जिल्हा परिषदेकडे पायपिट करून शाळेवर लवकरात लवकर पदस्थापना देण्यात यावी, म्हणून एक महिन्यापासुन पाठपुरावा करत होते. परंतु शिक्षण विभागाकडुन प्रतिसाद मिळत नसल्याने आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांना निवेदन देऊन पदस्थापना देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. 

हे देखील वाचाच - पोलिस भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंना हवे स्थान

श्री. जिरवणकर यांनी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के यांची भेट घेऊन  या शिक्षकांना लवकरात लवकर पदस्थापना देण्यासंदर्भाच चर्चा करून निवेदन दिले.  या निवेदनाची दखल प्रशासनाने घेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याचा मुहूर्त उशिराने का होईना सोमवारी ठरला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात आंतरजिल्हा बदलून आलेल्या ७८ गुरुजींना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिली. यामध्ये ७४ प्राथमिक शिक्षक, एक उर्दू शिक्षक, तीन विषय शिक्षक असे मिळून एकूण ७८ गुरुजींचा समावेश आहे. उशीरा का होईना पदस्थापना दिल्याने शिक्षकांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला. 

आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी कोरोना प्रादुर्भावामुळे विलंब लागला. मात्र, सोमवारी सर्व नियम पाळत शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. त्यामुळे शिक्षकांना शाळेवर रुजू होता येणार आहे.                                                 - संदीप सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी हिंगोली

loading image