
हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेवर सदस्यांनी बहिष्कार टाकत सभागृहातून काढता पाय घेतला.
हिंगोली : ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत, शाखा अभियंत्यांना प्रतिनियुक्ती का दिली, तसेच अधिकाऱ्याकडून सभेत मांडलेल्या प्रश्नाचे अनुपालन केले जात नाही यावर सदस्य चांगलेच आक्रमक होऊन प्रतिनियुक्ती मुद्यावरून चांगलेच रणकंदन झाले. अखेर सदस्यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकत सभागृहातून काढता पाय घेतला.
अधिकाऱ्यांना धरले धारेवर
जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.दोन) सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष मनीष आखरे, समाजकल्याण सभापती फकिरा मुंडे, महिला बालकल्याण सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण, बाजीराव जुमडे, सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, धनवंत माळी, डॉ. मिलिंद पोहरे आदींची उपस्थिती होती. बाळासाहेब मगर, विठ्ठल चोतमल, अजित मगर यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. यावर अधिकारी निरुत्तर झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेत २६ जेईचे पद मंजूर असून २४ पदे भरली आहेत तीन पदे प्रतिनियुक्तीवर कसे काय भरले असा मुद्दा अंकुश आहेर यांनी उपस्थित करून प्रधानमंत्री ग्रामविकास योजनेची अंमलबजावणी का होत नाही यावर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बांधकाम विभागाने व्यक्त केली दिलगिरी
एकतर प्रतिनियुक्ती रद्द करा किंवा वेतन बंद करा यावर किमान सव्वा तास चर्चा झाली. २००१ पासून प्रतिनियुक्तीचा मुद्दा उपस्थित केला जात असताना माहिती का मिळत यासाठी याबाबतची परिपूर्ण माहिती बांधकाम विभागाने सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली.
हेही वाचा - आष्टी तालुक्यात एक ब्रास वाळू घेण्यासाठी सात ते आठ हजार रुपये मोजावे लागत असताना ही कारवाई झाली
केवळ टाईमपास म्हणून सभा घेऊ नका
अंकुश आहेर व अनिल पतंगे यांनी ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले असता पाचही गटविकास अधिकाऱ्यांना मुख्यालयी किती ग्रामसेवक राहतात याची माहितीच विस्तार अधिकारी यांच्याकडून मिळत नसल्याची उत्तरे मिळत होती, त्यामुळे सदस्य चांगलेच संतापले आणि अधिकाऱ्यांना प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, अनुपालन केले जात नाही, सभागृहाला विचारलेल्या प्रश्नांची माहिती मिळत नाही, केवळ टाईमपास म्हणून सभा घेऊ नका, अधिकाऱ्यांनी तयारी करून सभागृहात येणे गरजेचे असताना असे का होत नाही यावरून सदस्य चांगलेच आक्रमक झाले अन् अखेर अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत सभागृहातून काढता पाय घेत सभेवर बहिष्कार टाकला.
संपादन ः राजन मंगरुळकर