
छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमोल बाबूराव खोतकर हा गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या गोळीबारात ठार झाला. एन्काउंटरची ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास साजापूर रोडवरील हॉटेल साई गार्डनसमोर घडली. खोतकर हा उद्योजक संतोष लढ्ढा यांच्या घरावर पडलेल्या साडेतीन कोटींच्या दरोड्यातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस पकडण्यासाठी गेले असता अमोलने अंगावर कार घालत गोळीबार केला आणि प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोलचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. दरम्यान, आपल्या भावाची सुपारी घेऊन हत्या झाल्याचा आरोप अमोलची बहीण रोहिणी खोतकर हिने केला असून, याप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.