होळी खेलार लमाण भिया

Holi festival in tanda
Holi festival in tanda

आंबुलग्याच्या उशाला पाच पंचवीस खोपीवजा घरांचा लमाणांचा केवळा तांडा वसला आहे. कुंभाराच्या माळउतारावरची ही वस्ती, बसमधून जाणाऱ्या-येणाऱ्याला एखाद्या चित्रासारखी साजरी दिसते. लमाणांची शेतं अशाच पासलत्या उतारावर अवघडून पसरलेली. जमीन बुकनाची. पिंगट-तांबट मातीची. या मातीत हे लमाणी डोंगराएवढे काबाडकष्ट करीत साल गुजारतात. सांजचा पार टळला... दिवेलागण झाली की तांड्याची दरी पार करून लेंगीचे स्वर गावाकडं ओघळतात...

     काइं देव जलम दिणों
     होळी खेलारं
     बचिया जगिया तो
     फेर खेला होळी
    कांइ देव जलम दिणों हाळी खेलार...

रान-माळात,डोंगर कपारीत,गिरी - कंदरात वस्ती करून राहणारा ...मेहनती गुण वैशिष्ट्यानं आपली जीनगानी आबादी आबाद करणारा बंजारा समाज असा जगावेगळा आहे.

फाल्गुन उजाडता झाला की लमाणांच्या तांड्यावर होळीचे रंग बहरू लागतात. साऱ्या मुलखाचा ऊस साखर कारखान्यांच्या गव्हाणीत रिचवून या बहाद्दर पुतांचे तांडे आपापल्या तांड्यांकडं परतू लागतात. आपल्या तांड्यांची, डोकरा-डोकरीची... अन् शाळा शिकणाऱ्या छिचाबरांची त्यांना ओढ लागलेली असते. ठेकेदारांकडून उरला-सुरला पैका घेऊन, कनवटीला बांधून... तांडा वजे वजे पुढं सरकत असतो.वाटंत लागणाऱ्या थोरल्या बाजारहाटात शिमग्याचा जुमला बाजार केला जातो... निघता निघता बाटली पोटात वतून हा मर्द ; होळीची-लेंगीची गाणी गात गात आपल्या तांड्याची वाट तुडवू लागतो.

    दसऱ्याचं सोनं साऱ्या गणागोताला वाटून... शीव ओलांडून.. कारखान्याची वाट धरणारा हा डोंगर-दऱ्यांतला रांगडा लमाण पाच-साडेपाच महिने आपल्या बायकोला न् जानजमान पोरा-पोरींना घेऊन थंडी - उन्हात मरणाचा राबत असतो. अन् साऱ्या मुलखातल्या लोकांना साखर खाऊ घालून तोंड गोड करीत असतो. या साऱ्या खटकरमात त्याच्या पदरात काय पडतं? हे मात्र त्याचं त्यालाच माहित.

   एकदाचा साखर कारखान्याचा पट्टा पडला की देश स्वतंत्र झाल्याचा मायंदळ आनंद त्यांच्या तोंडावरून निथळत असतो. आता कामं सरलेली असतात. जीवाचा आराम करायला आता तो मोकळा झालेला असतो. कारखान्याला रामराम ठोकताच एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करून होळीच्या आनंदसोहळ्याला सुरुवात होते.दूर देशातून आपल्या गावा  तांड्याकडं जाईपर्यंत हा आनंद सारखा उतू जातो. गडी धोतर, खमीस, अन् डोईवर लाल शेमले घालून मिरवत असतात... तर बायका लेहंगा,ऐन्या ऐन्याची कचळी, बंदा रुपये लाऊन सजविलेला घुँगट घालून...खाली वर हातवारे करून लेंगीच्या गाण्यांवर थिरकत असतात. केवळातांड्यावरून लेंगीचे कंपित सूर कानावर पडू लागतात-


     एक बरस के बार बार महिना
     बारावे महिनामं आईरं होळी
     होळी खेलार भाई ,भाई होळी खेलार
     काईं देव जलम दिणों होळी खेलार...
     उटो रे डावे सांणे
     आपंळ खेला होळी
     होळी खेलारं भाई भाईर
     काइं देव जलम दिणों
     होळी खेलारं
    बचिया जगिया तो
    फेर खेला होळी
     कांइ देव जलम दिणों हाळी खेलार...


"अरं व्वाह !  इं तो आपळों शिवाजी मामार आवाज त्स।" कमरंला कचकाउन आवळलेलं धोतर,खमीस, डोईवर कडक इस्त्रीची टोपी, अक्कडबाज केलेल्या मिशा,पायात नालाचा जोडा. अन् डखन्या हाताच्या दोन बोटांत शिलगलेली बीडी... झुरके मरीत मारीत...लेंगी अंगात आल्यासारखी बेभान होऊन म्हणतो, शिवाजी राठोड मामा.

     रानोमाळ भडकत असलेल्या पळस फुलांना बघितलं की  तांड्या - तांड्यावर ध्या दुपारा ऐन उन्हाच्या कार्रात... घामाच्या धारांत कष्टणाऱ्या लमाणांची मला हटकून याद येते.इतकी ;की हे गोरमाटी इथल्या पळस फुलांशी, राना- माळाशी, झाडा-झुडपांशीच नाही तर ते इथल्या साऱ्या भूगोलाशीच एकजीव झाले आहेत. लमाणांच्याच्या लोकजीवनात होळीचा जसा सरंजाम असतो; तसंच पळसाला आणि त्याच्या फुलांनाही मायंदळ महत्त्व असतं. पळसाच्या झाडाला बंजारा भाषेत धाकडा म्हणतात. तर त्याच्या फुलांना केसुला.  व्वा ! ' केसुला ' किती बम्बाट नाव आहे.
     होळीच्या करीला तांड्यावर खाटकाला बोलाऊन बकरं कापल्या जातं...वाटे घातले जातात.इतर कुठल्याही समाजात तयार न होणारा 'सळोई ' हा मांसाहारी पदार्थ लमाणांमध्ये केला जातो.तशी लमाणांची खाद्य ,पेहराव,निवास संस्कृती इतरांपरता निराळी आहे.बकऱ्याची मुंडी, खूर, वजेडी, रक्त अन् ज्वारीच्या पिठाची मस्तपैकी सळोई बनविल्या जाते. ही सळोई दाबून हाणली की...लोटाभर पाणी पोटात रिचविलं ...मिशांवरून पालथी मूठ फिरविली की जीव जरा शांत होतो.
   दिवसभर मरमर करणारे लमाणी तितक्याच जिगरनं लेंगी खेळतात. झापड पडणीच्या वक्ताला जेवणं खावणं झाली म्हणजे एकीकडं बाया - पोरींची तर दुसरीकडं गड्यांची लेंगी रंगाला येऊ लागते. ठेकेदार पदन्यासाबरोबर मुठींची उघड झाप करणाऱ्या हातांची लयदार हलचाल दिक् होऊन बघण्यासारखी असते. माळरानात झुलणारे तांबडे - लाल पळसही बंजारा होऊन...भंग पिऊन ...लेंगी खेळत असल्याचा देखावा मोठा भारी असतो.
       
शिशिरानं पळसाचं पुरतं वस्त्रहरण केलेलं असतं.वस्त्रहरणानंतर पळसाला दिगंबरपंथाची दीक्षा घेणं भागच असतं. पुरतं खुडं झालेल्या त्याच्या डिऱ्यांना हिरवट, काळ्याभोर कळ्यांच्या लगडीच्या लगडी लटकू लागतात. पळसाच्या अंगावर या कळ्यांच्या रुपानं काळंकी चढते. चार पाच दिवस उलटतात न उलटतात तोच त्या काळ्या काळंकीतून ठिणग्या फुटाव्यात तशी फुलं पेटू लागतात. दिवसेंदिवस त्या ठिणग्यांचे इस्त्याचे केंडे होतात. सारं झाडंच खव खव इस्त्यानं बहरून गेलंय की काय; असं वाटतं. या त्याच्या भयंकर पेटतं दिसण्यानंच फिरंगी लोक त्याला Flame of the forest ' जंगलाचा जाळ ' म्हणतात.
निस् नागवं होऊन दिगंबरपंथाची दीक्षा घेतलेला पळस चार-आठ दिवसानं आंगोपांगी फुलारून येतो. अंगावरती भगवी वस्त्रं लेऊन...जटा वाढवून...भर उन्हाच्या कार्रात समाधी लाऊन बसणाऱ्या गोसायांसारखीच दिसतात; ही पळसाची झाडं.

गोसायांचा अस्सल कुंभमेळा बघावासा वाटला तर आमच्या दांडावरल्या महादेवाच्या पळसवनात या. रानोमाळ जिकडं-तिकडं नुस्ती लगबग चाललेली असते यांची. एकाच ठिकाणी अगणित अशा फुलारलेल्या... आस्कारलेल्या पळस-गोसायांना न्याहाळता येणारा नयनरम्य दर्शनसोहळा पळसवनाशिवाय या पृथ्वीतलावर कुठंच नसेल.

धुळीच्या दिवशी झुंजुरक्या उठून पळसवनातून लमाणपोर पळसाची फुलं घेऊन येतात. त्यांना उखळात वाटून रंग काढतात. तो मोठ्या बाटल्यांमध्ये भरून एक-दुसऱ्याच्या अंगावर टाकतात.एकदा कपड्यावर लागलेला पळसरंग ' कपडाच फाटंल पर निघणार नाही ' ; या बाण्याचा. ऐन वसंतात होळीचा साजण होऊन बहरून आलेला हा पळस मला मरणाचा आवडतो.

शिमग्याच्या होळीत  हिवाळा जळून खाक होतो. अन् चैताच्या चटक्यानं ऊन वरचेवर ठोकर होत जातं. असल्या निब्बर उन्हात नद्या नाले कोरडे ठाक पडतात. झाडांची पानं करप धरतात. ऊन जेवढा जोर करू लागल ; तेवढी किंवा त्याहूनबी भारी मस्ती पळसांच्या फुलात मातते. उन्हाच्या जोरदार माऱ्याला पळस फुलांचं तेज काकणभर सरस ठरतं. प्रखर उन्हाच्या दहशतीपुढं तेवढ्याच कणखरपणे अन् बाणेदारपणे उभा राहणारा पळस मला प्रस्थापित व्यवस्थेशी टक्कर घेणाऱ्या एखाद्या अँग्री यंग मैन हिरोसारखा वाटतो. आपलाच जानी दोस्त वाटतो. या गेंद फुलांना  'क्रांतिफूल ' ,' विद्रोहाचं फूल ' ही नावं किती साजरी वाटतात ?
    पळसांच्या सानिध्यात राहणाऱ्या लमाण लोकसंस्कृतीतमध्ये 'धुंड' हा एक मोठा आनंददायी विधी असतो. सालभरात ज्यांच्या ज्यांच्या घरात मुलाचा जन्म झाला ; अशा मुलाचं नाव  ठेवण्याचा लोकविधी म्हणजे धुंड. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूळ असते. याच दिवशी सकाळी तांड्यातल्या... नात्यातल्या बुजुर्ग बाया एकत्र जमतात. आणि बाळाचं नाव शोधण्याचा विधी आरंभ होतो.हे नाव शोधणं म्हणजेच 'धुंड'.

         सुवांळी चपाती लौंगे तळरीचू    गेरीया
            धाटो मत आ होळी रमरीचू गेरीया ...    

अशी गाणी गाऊन नाव ठेवण्याचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर एका भांड्यात लापशी शिजविली जाते.त्या भांड्याच्या गळ्याला सोलीनं बांधून दोन बाजूला मोठे खुंट रोवून तो दोर खुंट्यांना बांधल्या जातो.ते खुंटे उपडून भांडं पळवून नेऊन खाण्याचं मोठं आव्हान गड्यांवर असतं. आव्हान यासाठी की लापशीच्या भांड्याची राखण करायला सभोवती जहाँबाज बंजारा याडींचा घोळका जमतो. बेशरम,निरगुडीच्या फोका घेऊन लेंगी खेळत  असतो. भांड्याजवळ फिरकणाऱ्या गड्यांना त्या फोकांनी झोडपून काढतात. हा मजेशीर खेळ चांगलाच दोन तीन तास चालतो.अंगावर गोधडे ,वाकळा पांघरून फोकांचा मार खाऊन शेवटी हे गडी लापशीची लूट करतात..मग सारे पामळों - बिमळों पंगत धरून भोजन करतात.यातून मत - मनभेदांनी दुरावलेली मनं पुन्हा जुळतात.लमाणांच्या लोकसंस्कृतीतून नकळतपणे अशा चांगल्या परंपरांची पेरणी होते.समाज आणि लोकसंस्कृती अधिक एकजीव होते.होळीच्या रंगबाज उत्सवानं लमाणांची कलरफुल संस्कृती अधिकच रंगीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com