बचत गटाच्या खिचडीत अळ्या, माशा अन्‌ काच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

खिचडीमध्ये अळ्या, माशा आणि काच निघत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात आल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी सोमवारी (ता. 22) महापालिकेकडे केली. 

औरंगाबाद - शालेय पोषण आहाराअंतर्गत इस्कॉनतर्फे दिली जाणारी दर्जेदार खिचडी बंद करून शासनाने निविदा प्रक्रिया राबवून शहरातील 347 शाळांच्या एक लाख 10 हजार विद्यार्थ्यांसाठी 16 बचतगटांची नियुक्ती केली आहे. दोन जुलैपासून बचतगटांतर्फे खिचडीचे वाटप सुरू आहे. या खिचडीमध्ये अळ्या, माशा आणि काच निघत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात आल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी सोमवारी (ता. 22) महापालिकेकडे केली. 

शहरातील महापालिका व खासगी अनुदानित शाळांना इस्कॉनतर्फे काही वर्षांपासून खिचडी दिली जात होती. "ना नफा ना तोटा' तत्त्वावर सुरू असलेल्या या खिचडीची विद्यार्थ्यांना एवढी गोडी निर्माण झाली आहे की, महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढल्याचे समोर आले होते. दरम्यान राज्य शासनाने इस्कॉनची खिचडी बंद करून निविदा प्रक्रिया राबवीत 16 बचतगट नियुक्त केले. दोन जुलैपासून बचतगटांमार्फत खिचडी दिली जात आहे. मात्र अवघ्या वीस दिवसात खिचडीच्या दर्जाबाबत तक्रारी सुरू झाल्या आहेत. डॉ. पद्‌मसिंह पाटील प्रा. विद्यालय व अमनविश्‍व हायस्कूल येथे श्री स्वयंसेवी महिला बचतगटातर्फे खिचडी दिली जाते. या संस्थेबाबत शाळांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात खिचडीमध्ये काच व माशा निघाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

खिचडीत योग्य प्रमाणात तेल नसते. आवश्‍यक जीवनसत्त्वांचा अभाव आहे. खिचडी सीलबंद डब्यात न देता साध्या झाकणाच्या डब्यात पाठविली जाते. अनेक विद्यार्थी ही खिचडी खाण्यास नकार देत आहेत. खिचडीत दाळी, भाजीपाला याचा वापर केला जात नाही. काहीवेळा खिचडी कच्ची असते. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात आहार दिला जात नाही. करारात नमूद केल्याप्रमाणे मदतनीस नाही, त्यामुळे बचतगटांची खिचडी बंद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिल्याचे मुख्याध्यापक बाबूराव नालमवार, सुधारक पवार यांनी सांगितले. 
 
पालकांनी काढला मोर्चा 
खिचडीत 18 जुलैला अळ्या, माशा आणि काचेचे तुकडे आढळून आले. हा प्रकार पालकांना समजताच शाळेवर मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका, अशी मागणी पालकांनी केली आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House Fly in food