जिल्हा बंदीमुळे शेकडो नागरिक अडकले !

कृष्णा पिंगळे
Monday, 23 March 2020

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रसार झाल्याने पुणे सोडून आपल्या गावाकडे येणाऱ्यांच्या संख्येत वाढ

सोनपेठ (जि.परभणी) :  पुणे जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रसार झाल्याने पुणे सोडून आपल्या गावाकडे येणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने राज्यसरकारने जिल्हा बंदीची घोषणा केली आहे. या जिल्हा बंदीमुळे शेकडो नागरिक रस्त्यातच अडकून पडले आहेत. 

हेही वाचा - ‘त्या’लोकांचा शोध घेण्यासाठी पथके

सोनपेठ (जि.परभणी) तालुक्यातील हजारो नागरिक नोकरी उद्योग धंदा व शिक्षण या निमित्ताने पुणे पिंपरी चिंचवड तसेच पुण्याच्या इतर भागातही राहतात.  कोरोना रोगाच्या प्रादुर्भावा नंतर यातील हजारो नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी आपले घर गाठले आहे. अनेकांनी आपले घर गाठले असले तरी शेकडो विद्यार्थी कामगार हे सुट्टी न मिळाल्यामुळे तसेच परत जाण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्यामुळे गावाकडे परतण्याच्या आशेवर थांबले होते. परंतु सरकारने रेल्वे, बस, खासगी ट्रॅव्हल्स या बंद केल्या. तसेच रविवारच्या जनता कर्फ्यु मुळे ही सगळी मंडळी पुण्यातच अडकून पडली होती. 

विद्यार्थी मंडळी आली रडकुंडीला
 सोमवार (ता.२३) सकाळपासूनच मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न करत होती. सकाळी लवकर निघालेली मंडळी गावाकडे पोहोचली. परंतु, उशिरा निघालेल्या नागरिकांना मात्र पुणे नगर जिल्ह्याच्या हद्दीवर अडवण्यात आले. तसेच त्यांना जिल्हा बंदीचा निर्णय सांगून त्यांना परत जाण्यास बजावले. पुण्याहुन घरी जाण्याच्या आशेवर निघालेली विद्यार्थी मंडळी या प्रकारामुळे रडकुंडीला आली होती. गावाकडे घडल्या प्रकारची माहीती देऊन ते सर्व नागरिक व विद्यार्थी हे पुण्याकडे वापस परतली. परतलेल्या या विद्यार्थ्यांना आपल्या जवळील पैसे देखील संपल्यामुळे त्यांच्या राहण्या व खाण्यापिण्याची चिंता त्यांच्या पालकांना सतावत आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच कामासाठी असलेले नोकरदार, उद्योग व्यवसायासाठी गेलेले मजूर यांना देखील परत पाठवल्यामुळे त्यांची देखील पुण्यात चांगलीच पंचाईत होणार आहे. 

हेही वाचा व पहा - Video: अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचे कवितेतून जनतेला आवाहन

अन्यथा रस्त्यावरच रात्र
रविवारचा जनता कर्फ्यु संपल्यावर सुरक्षित आपल्या घरी जाता येईल, या उद्देशाने सोमवारी सकाळीच खासगी वाहन करून सोनपेठला निघालो होतो. परंतु मध्येच नगर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी अडवून जिल्हा बंदीचा आदेश निघाला असून परत जाण्यास बजावले. आता परत पुण्याकडे निघालो आहोत. आता पुणे पोलिसांनी शहरात घेतले तर ठीक अन्यथा रस्त्यावरच रात्र काढावी लागेल. 
-प्रकाश शास्त्री, सोनपेठकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of citizens are trapped by district ban!