दोन चपात्या कुणाला पुरणार साहेब..?

गणेश पांडे
मंगळवार, 31 मार्च 2020

लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या लाखो लोकांच्या एकावेळच्या जेवणाचेदेखील वांदे झाले आहेत. गरजू, दीन-दुबळ्यांना मदत करावी, असे आवाहन केंद्र व राज्य शासनाने केले आहे. परंतु, कोण व कुठपर्यंत पुरणार, हा प्रश्न आता पडू लागला आहे.

परभणी : सगळ बंद असल्याने आमच्यासमोर पोट कस भराव याचा प्रश्न पडला आहे. जेवण वाटणारे येतात परंतु, केवळ दोन चपात्या व थोडी भाजी देतात. त्या कुणा - कुणाला पुरणार साहेब... असा प्रश्न परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयासमोरील मोकळ्या मैदानात बसलेल्या पालांतील नागरिकांनी उपस्थित केला आहे. एका झोपडीत पाच ते सहा माणसे.. असे या ठिकाण ३० ते ४० झोपड्या आहेत.

कोरोनाचे संकट कुणाला कसे संपवून टाकील याची शाश्वती नाही. अवघ्या जगाची अर्थव्यवस्थाच या कोरोनाच्या संकटामुळे डबघाईला आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी टोकाचे पाऊल म्हणून लॉकडाउनची घोषणा केंद्र शासनाने केली. परंतु, या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या लाखो लोकांच्या एकावेळच्या जेवणाचेदेखील वांदे झाले आहेत. गरजू, दीन-दुबळ्यांना मदत करावी, असे आवाहन केंद्र व राज्य शासनाने केले आहे. परंतु, कोण व कुठपर्यंत पुरणार, हा प्रश्न आता पडू लागला आहे.

हेही वाचा - वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा ! सुरवातीचे दोन दिवस काढले उपाशीपोटीच 
सध्या परभणीच्या वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयासमोरील मोकळ्या जागेत ३० ते ४० झोपड्या लागलेल्या आहेत. या झोपड्यांतील लोकांचा व्यवसाय म्हणजे सुया, दोरे विकणे, कानातील मळ साफ करणे, पाटे, वरवंटे तयार करून देणे असा आहे. दररोज झोपडी सोडल्याशिवाय या लोकांना दोन घास मिळत नाहीत. परंतु, लॉकडाउनमुळे या लोकांचे उत्पनाचे साधनच बंद पडले आहे. त्यात जवळ दोन - चार रुपये असले तरी उपयोग काय..? बाहेर कुठेच काही मिळत नसल्याने खायला तरी काय अणावे, असा प्रश्न या लोकांसमोर पडला. सुरवातीलचे एक - दोन दिवस या झोपड्यांतील अनेक जण उपाशीच झोपले. त्यात लहान मुलांची व महिलांची संख्या जास्त आहे. आता समाजातील दानशूर व्यक्ती शहरातील अशा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत. परंतु, एका झोपडीत ठराविक अन्न पोचविले जात असल्याने यातील अनेकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

अनेक जण अर्धपोटी
गेल्या आठ दिवसांपासून या ४० झोपड्यांमधील अनेक जण उपाशी पोटी झोपत आहेत. कुणालाही पूर्ण जेवण मिळत नाही. हाताला काम नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट आहे. मदत करणार येतात परंतु, संख्या जास्त असल्याने एका झोपडीतील काहींना उपाशी राहावे लागत आहे.
- अशोक अत्राम, नागरिक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunger for the inhabitants of the Pal,parbhani news