अन्नाच्या शोधासाठी पशुधनाची उपासमार, तरीही गोपालक मात्र निर्धास्त

gai
gai

परभणी ः प्राण्यांनाही ‘कोरोना’ची लागण शक्य असताना शहरातील काही गोपालक आपली काही जबाबदारीच नाही असे समजून आपल्या गुराढोरांना नेहमीप्रमाणे मोकाट सोडत असून संचारबंदीतही त्यांचे कळप विविध भागात फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता निर्ढावलेल्या गोपालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

सध्या ‘कोरोना’चे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. अशा परिस्थितीत ही जनावरे शहरात मोकाट फिरताना दिसून येतात. त्यांनादेखील या विषाणूची बाधा होण्याची व त्यातून फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील हे गोपालक त्यांना मोकाट सोडत आहेत. 

एक गाय दगावली तर वासरू आजारी 
या बंदीच्या काळातदेखील एक गाय दगावली, तर एक वासरुदेखील रस्त्यावरच आजारी पडले आहे. शहरातील काही गोरक्षकांनी त्यांच्यावर खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्याचे प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे हे पाळीव प्राणी विशेषतः गायी रस्त्यावर येऊन नये म्हणून त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी गोरक्षकांकडून होत आहे. 

लोकसेवक धावले मदतीला 
शहरात फिरत असताना आता या पाळीव पशूंना नेहमीप्रमाणे अन्नदेखील मिळत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत असून त्यांचे पालक मात्र निर्धास्त आहेत. पालिका तसेच काही लोकसेवक त्यांना मिळेल ते अन्न खाऊ घालत आहेत. परंतु, तो पुरेसा नाही. भाजीमार्केट, दुकाने, उपहारगृहे बंद असल्याने त्यांची उपासमार होत असून अन्नाच्या शोधात ते वणवण भटकत आहेत.

गोपालकांचा दुभत्यावर डल्ला
या मोकाट जनावरांचे पालक मात्र त्यांच्या चाऱ्यावर फारसा खर्च न करता त्यांना मोकाट सोडून देतात. केवळ या पशूंच्या दुभत्यावर तसेच त्यांच्यापासून मिळणाऱ्या पशुधनावर डल्ला मारण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा
महापालिकेला तर पशुवैद्यकीय अधिकारीच नाही. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी असो, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातदेखील सेवा मिळाली नसल्याची माहिती या गोरक्षकांनी दिली. एकीकडे मनुष्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न होत असताना पशूंकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

गोरक्षकास कर्मचाऱ्याची शिविगाळ
पालिकेच्या कोंडवाड्यातील पशूंना चारा मिळतो का नाही, याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गोरक्षकास तेथील एका कर्मचाऱ्याने शिवीगाळ केल्याचे समजते. व्हिडिओ शुटिंग करू लागल्यानंतर मात्र तो कर्मचारी त्यापासून पळ काढत असल्याची माहिती त्या गोरक्षकाने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com