अन् पती झाला ‘सेट’

शिवचरण वावळे
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नांदेड : कोणत्याही यशस्वी पुरुषामागे महिला असते, असे नेहमीच म्हटले जाते ते अगदी बरोबर आहे. अशीच घटना नांदेडमध्ये घडली असून पत्नीच्या प्रेरणेतून पतीने तब्बल २० वर्षाच्या शिक्षणाच्या खंडानंतर तिसऱ्या प्रयत्नात सेट परिक्षेला गवसणी घातली आहे.

नांदेड : कोणत्याही यशस्वी पुरुषामागे महिला असते, असे नेहमीच म्हटले जाते ते अगदी बरोबर आहे. अशीच घटना नांदेडमध्ये घडली असून पत्नीच्या प्रेरणेतून पतीने तब्बल २० वर्षाच्या शिक्षणाच्या खंडानंतर तिसऱ्या प्रयत्नात सेट परिक्षेला गवसणी घातली आहे.

मुळचे जालना येथील रहिवाशी असलेले सुरेश सत्यनारायण तिवारी यांचे १९९६ ला बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांचा नांदेडच्या मनिषा तिवारी यांच्यासोबत १९९८ मध्ये विवाह झाला. मनिषा यांनीही लग्नापूर्वीच बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. लग्नानंतर पती-पत्नीची शिक्षणा विषयीची तळमळ कायम होती. परंतु घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे एकाच वेळी दोघांना शिक्षण घेणे शक्य नव्हते. 

असा शोधला मार्ग

मनिषा यांना पाठबळ देण्याच्या हेतूने पती सुरेश तिवारी यांनी जालना येथील तहसिल कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून नोकरी स्वीकारली. अन् पत्नीची शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘तू शिकत रहा, मी पैसे पुरवतो’ या भूमिकेतुन पत्नी मनिषा यांना मोकळीक दिली. मनिषा यांनी शिक्षणासाठी नांदेडला माहेर जवळ केले. त्यांच्या पाठोपाठ २००८ मध्ये सुरेश तिवारीही जालना सोडून नांदेडला आले आणि इथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परिक्षा विभागात अंशकालीन कर्मचारी म्हणून नोकरीला सुरुवात केली.

पत्नीने इच्छा केली पूर्ण

मनिषा या नांदेडला आल्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ होम सायन्स, एम. ए. मानसशास्त्र, एम. फिल. बी. एड्‍. सायकाॅलॉजी हे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मनिषा तिवारी यांनी २०१७ मध्ये सायकाॅलॉजी विषयातील सर्वोच्च पदवी समजली जाणारी पदवी अर्थात पीएच. डी. पदवीही प्राप्त केली. पत्नी आणि मुलांचे समाधानकारक शिक्षण होईपर्यंत खंबीर असलेल्या पतीची देखिल शिक्षणाची इच्छा अपूर्ण राहू नये म्हणून मुलगा आणि पत्नीने सुरेश तिवारी यांना वीस वर्षाच्या शिक्षणात पडलेला खंड विसरुन तुम्ही पुढचे शिक्षण घ्या, म्हणून त्यांच्याकडे आग्रह धरला होता.

तिसऱ्या प्रयत्नात यश

पत्नी आणि मुलाच्या आग्रहामुळे शिक्षणातील वीस वर्षाच्या खंडानंतर सुरेश तिवारी यांनी २०१५ मध्ये पुणे येथील टिळक मुक्त विद्यापीठात एम. ए. हिंदीला प्रवेश घेतला. २०१७ मध्ये दूरस्थ शिक्षण पद्धतीने एम. ए. पूर्ण केले. सेट परिक्षा दिली परंतु ते सलग दोन वेळा सेट परिक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाही. परंतु मुलगा आणि पत्नीने त्यांना सतत प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आणि प्रेरणेमुळे अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी सेट परिक्षेला गवसणी घातली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband becomes 'set'