Beed Crime News : सासुरवाडीत पत्नीची हत्या; पतीला जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

husband killed wife family dispute crime beed police action suspect arrested

Beed Crime News: सासुरवाडीत पत्नीची हत्या; पतीला जन्मठेप

बीड : माहेरी गेलेल्या विवाहितेची सासुरवाडीत जाऊन न विचारता, माहेरी का आलीस? म्हणत चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. खुनाची घटना दोन वर्षांपूर्वी बोरखेड (ता. बीड) येथे घडली होती. अपर सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील सोमवारी (ता. ३०) शिक्षेचा निकाल सुनावला. शहाजी काळे (वय ३२, रा. हंगेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

शहाजी काळे याची पत्नी नगिणा (वय २५) हिचे माहेर बोरखेड (ता. बीड) आहे. घटनेच्या आधी नऊ वर्षांपूर्वी नगिणाचा विवाह शहाजीशी झाला होता. लग्नानंतर ती सासरी नांदण्यास गेली. मात्र, पती- पत्नीत सतत वाद होत. पतीशी भांडण झाल्याने नगिणा ता. आठ ऑक्टोबर २०२० रोजी माहेरी निघून आली होती.

दोन दिवसांनी म्हणजे ता. १० ऑक्टोबर २०२० रोजी शहाजी काळे हा सासुरवाडीत गेला. तू मला न विचारता माहेरी का आलीस, अशी कुरापत काढून त्याने चाकूने कानावर, छातीवर, पोटात सपासप वार केले. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून शहाजी काळे याने पोबारा केला. माहेरच्या लोकांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

नगिणा काळेच्या आईच्या फिर्यादीवरून नेकनूर ठाण्यात पती शहाजी शहात्तर काळाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला. तत्कालीन सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व उपनिरीक्षक किशोर काळे यांनी तपास करुन मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण अपर सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणीसाठी आले.

सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले. तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. घटनास्थळी आढळलेले पुरावे, न्यायवैद्यक चाचणी अहवाल देखील आरोपीला शिक्षेपर्यंत पोचविण्यास महत्त्वाचा ठरला. सरकारी वकील अनिल धसे यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी आरोपी शहाजी काळेला दोषी ठरवून दहा हजार दंड व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अटकेपासून आरोपी कारागृहात होता.