शेतात काम करणाऱ्या दांपत्यावर बिबट्याचा हल्ला 

यादवकुमार शिंदे 
सोमवार, 22 जुलै 2019

पती-पत्नीवर बांधावरील गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात पती-पत्नीने एकमेकांना वाचविण्यासाठी बिबट्याशी सुमारे तासभर संघर्ष केला.

सोयगाव (जि. औरंगाबाद) - शेतात निंदणाचे काम करणाऱ्या पती-पत्नीवर बांधावरील गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात पती-पत्नीने एकमेकांना वाचविण्यासाठी बिबट्याशी सुमारे तासभर संघर्ष केला.

यावेळी आरडाओरड केल्याने शेजारी मदतीला धावून आल्याने हे दांपत्य बचावले. मात्र यात हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (ता. 21) दुपारी चारच्या सुमारास कवली (ता. सोयगाव) शिवारात हा थरार घडला. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. कवली शिवारात भारत हरिचंद चव्हाण (वय 30) आणि मनीषा भारत चव्हाण (वय 23, रा. वरसाडा, ता. पाचोरा) हे दांपत्य शेतात खुरपणीचे काम करीत असताना बांधावर गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पहिल्यांदा मनीषा चव्हाण यांच्यावर हल्ला केला.

हा प्रकार लक्षात येताच भारत चव्हाण यांनी बिबट्याशी जवळपास तासभर संघर्ष करून पत्नीची सुटका केली; परंतु चवताळलेल्या बिबट्याने पुन्हा भारतला जबड्यात धरल्याने पत्नीने आरडाओरड केली. यावेळी शेताजवळच असलेल्या अजमोद्दीन तडवी, मनोज पाटील आणि विष्णू पाटील यांनी धाव घेत बिबट्याला हुसकावून लावले. 
या हल्ल्यात भारतच्या पाय, हात व मणक्‍याला गंभीर इजा झाली असून, त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. जखमींना पिंपळगाव (हरे, ता. पाचोरा) येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तातडीने जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बिबट्याने चौघांना दोन तास झुंजविले 
पत्नी मनीषाला वाचविण्यासाठी भारत चव्हाण यांनी बिबट्याशी तासभर संघर्ष करून पत्नीची सुटका केली; मात्र त्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने भारतला जबड्यात घेतले. पत्नीने आरडाओरड केल्यानंतर अजमोद्दीन तडवी, विष्णू पाटील, मनोज पाटील या तिघांनी भारतला वाचविण्यासाठी बिबट्याचा प्रतिकार केला. बिबट्याशी जवळपास दोन तास हा संषर्घ सुरू होता. घटनास्थळी शेतात बिबट्या आणि चौघा शेतकऱ्यांच्या झुंजीच्या खुणा स्पष्ट उमटल्या आहेत. त्यात अजमोद्दीन तडवी यांनाही बिबट्याने लोळविले. 

तिघांची कसरत 
जवळच असलेले अजमोद्दीन तडवी, मनोज पाटील, विष्णू पाटील हे तिघे चव्हाण दांपत्याच्या बचावासाठी धावून आले. या तिघांनी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून चव्हाण दांपत्याला वाचविल्याने सोयगाव तालुक्‍यात या तिघांचे कौतुक केले जात आहे. जखमी दांपत्याला मदत दरम्यान, वन विभागाचे वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक भिका पाटील, माया जिने, वनमजूर गोविंदा गांगुर्डे, छगन झाल्टे आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमी दांपत्याला तातडीची मदत म्हणून वीस हजार रुपये जाहीर केले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळावरून बिबट्याच्या पायांचे ठसे तपासले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband wife injured in leopard attack