आयएएस आधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना प्रेमाचा सल्ला

शिवचरण वावळे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

अभ्यासात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्य येते. एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून कधीच दुःख करत बसण्यापेक्षा झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत, यासाठी पुन्हा नेटाने परीक्षेच्या तयारीला लागले पाहिजे. अभ्यासात कुठल्याही एका विषयाला कमी अथवा अधिक महत्व न देता. सर्व विषयांना समान वेळ देऊन प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास तुम्हाला कधीच अपयशाचा सामना करावा लागणार नाही.  

नांदेड : शासकीय अधिकारी होण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेकडे जरूर पहावे. विषय कुठलाही असो त्यास कमी लेखू नका कारण अभ्यासलेला प्रत्येक विषय जीवनात कुठे ना कुठे कामी येतोच. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जन्मभराची शिदोरी म्हणून बघितले पाहिजे. त्यासाठी मेहनत, चिकाटी आणि जिद्द असावी. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे, असे प्रतिपादन एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त सोमवारी (ता.१७) कुसुम सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पुलकुंडवार बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार अमिता चव्हाण, आमदार अमर राजूरकर, के. एम. अभर्णा, मुंबई पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, ‘युनिक’चे तुकाराम जाधव, अरविंद मुंढे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा- 

अभ्यासाच्या लढाईत शेवटपर्यंत हार मानू नये
डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, विद्यार्थी हा देशाचे उज्ज्वल भविष्य आहे आणि या भविष्याला घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे असते. विद्यार्थी दशेपासून अंगी नम्रता असेल तर यश संपादन करणे सोपे होते. विद्यार्थ्यांनी अपयशाची भीती बाळगू नये. अभ्यासाच्या लढाईत उतरल्याने शेवटपर्यंत हार मानू नये.
जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, ही काळाची गरज बनली आहे. सततच्या वाचनातून भाषेवर प्रभुत्व आणि आत्मविश्वास वाढत जातो. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य वाढवावे, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

हेही वाचले पाहिजे-

मीडियामुळे वाचनावर परिणाम
यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर म्हणाल्या की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत:ला प्रश्न विचारणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे वाचनावर परिणाम झालेला आहे. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी ए आणि बी असे दोन्ही प्लॅन तयार ठेवायला हवेत, असेही श्रीमती करंदीकर यांनी सांगितले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक माजी राज्यमंत्री सावंत यांनी केले. प्रा. विद्याधर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर नरेंद्र चव्हाण यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS Officers' love Advice For Students Nanded news