साठ वर्षांपुढील व्यक्ती दिसल्यास दुकान सील, लातूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

विकास गाढवे
मंगळवार, 30 जून 2020

लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असून, याला आवर घालण्यासाठी साठ वर्षांपुढील व्यक्ती मालक किंवा नोकर म्हणून दुकानात दिसल्यास ते दुकान लॉकडाउन संपेपर्यंत बंद करण्यात येणार आहे, अशी सक्त कारवाई करण्याबाबत जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी (ता. २९) फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात दिली.

लातूर : कोरोनाला सोबत घेऊन उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने मिशन बिगिन अगेन हाती घेतले आहे. यातूनच टाळेबंदीत शिथिलता देऊन एक जूनपासून अनलॉक एकचा टप्पा सुरू केला आहे; मात्र अनेकजण काळजी न घेता व्यवसाय करीत आहेत. यात साठ वर्षांपुढील व्यक्ती व्यवसायात झोकून देऊन स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असून, याला आवर घालण्यासाठी साठ वर्षांपुढील व्यक्ती मालक किंवा नोकर म्हणून दुकानात दिसल्यास ते दुकान लॉकडाउन संपेपर्यंत बंद करण्यात येणार आहे,
अशी सक्त कारवाई करण्याबाबत जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी (ता. २९) फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात दिली.

कोरोनाचा सर्वाधिक धोका पन्नास वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व बालकांना आहे. हे वारंवार सांगूनही लोक काळजी घेत नसल्याचे दिसत आहे. मला काहीच होणार नाही, या मानसिकतेतून ज्येष्ठ मंडळी घराबाहेर पडून धोका पत्करताना दिसत आहेत. यात बहुतांश विविध व्यवसायांतील कुटुंबांतील व्यक्ती आहेत. उदगीरला एका ज्येष्ठ किराणा व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात एका व्यापाऱ्याच्या कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्तीवर कोरोनाने घाला घातला. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांत मोठ्या संख्येने ज्येष्ठ व्यक्तीच आहेत. यामुळे प्रशासनाने ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घेण्यासाठी अभियान हाती घेतले असताना, दुसरीकडे काही व्यावसायिक ज्येष्ठांच्या काळजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

लातुरातील शाळा अन् महाविद्यालयांचा पुनश्च हरिओम लांबला, कोरोनाचा परिणाम

यातूनच ज्येष्ठ मंडळी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जात असून, त्यांचा व्यवसायाच्या निमित्ताने वावर वाढला आहे. याचा फटका काही ज्येष्ठ व्यापाऱ्यांना बसला. काहींना कोरोनाची लागण झाली. ही बाब जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सोमवारी गांभीर्याने घेतली. त्यानंतर दुकानात साठ वर्षांपुढील मालक किंवा नोकर दिसून आल्यास ते दुकान लॉकडाउन संपेपर्यंत सील (बंद) करण्याचा निर्णय घेण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘फेसबुक लाइव्ह’ची शंभरी
कोरोनाच्या संकटात लोकांशी संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे समाधान करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी ‘फेसबुक लाइव्ह’चा उपक्रम सुरू केला. एकही दिवस खंड न पडू देता हा उपक्रम सुरू ठेवण्यात श्रीकांत यांना यश आले आहे. उपक्रमाचा सोमवारी शंभरावा भाग होता. उपक्रमामुळे मागील शंभर दिवसांत प्रशासनाला खूप चांगले काम करता आले. शासनाच्या अनेक योजनांची माहिती लोकांना कळाली. कोरोनामुळे संपर्क तुटलेल्या लोकांचे प्रश्न व समस्या घरबसल्या सोडविण्यात यश आले. जिल्ह्यातील लोकांनी उपक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला. प्रशासनाची कोणतीही लोकाभिमुख संकल्पना पॅटर्न होऊन जाते, यानिमित्ताने सिद्ध झाले व फेसबुक लाइव्हचाही एक लातूर पॅटर्न निर्माण झाल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If There Is Above Sixty Age Person, Then Stores Sealed Latur News