esakal | जालना बनलाय गावठी बंदूकवाल्यांचा अड्डा? 
sakal

बोलून बातमी शोधा

जालना ः जप्त केलेल्या गावठी पिस्तूलची पाहणी करताना पोलिस अधीक्षक चैतन्य एस., अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, अभय देशपांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, यशवंत जाधव आदी.

जालना -  जालन्यासह जिल्हा जणू गावठी बंदूकवाल्याचा अड्डाच बनला की काय? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. मागील साडेअकरा महिन्यांत पोलिसांनी तब्बल सात गावठी पिस्तूल जप्त केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पिस्तूल येतात कोठून , याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.

जालना बनलाय गावठी बंदूकवाल्यांचा अड्डा? 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  जालन्यासह जिल्हा जणू गावठी बंदूकवाल्याचा अड्डाच बनला की काय? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. मागील साडेअकरा महिन्यांत पोलिसांनी तब्बल सात गावठी पिस्तूल जप्त केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पिस्तूल येतात कोठून , याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन दिवस-रात्र काम करीत आहे. जिल्ह्यातील घरफोड्या, सशस्त्र दरोडे रोखण्यासाठी पोलिसांकडून रात्रगस्त केली जाते; तसेच कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाते; मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन होताना दिसत नाही. केवळ गोपनीय खबऱ्यामार्फत विविध गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून केली जाते. 

तलवारी, चाकू, कोयतेही सापडलेले 
पोलिसांनी आतापर्यंत जिल्ह्यातून तब्बल सात गावठी पिस्तूल जप्त केले आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेने पाच, तर "एडीएस'ने दोन पिस्तूल जप्त केल्या आहेत; तसेच दहा तलवारींसह चाकू, रामपुरी, कोयता असे हत्यार देखील पोलिसांना विविध प्रकरणांत गुन्हेगारांकडे सापडलेले आहेत. 

हेही वाचा : जालन्यात बेघरांना मिळतोय "आपुलकी'चा सहारा 

औरंगाबादच्या विद्यार्थ्याकडे आढळले पिस्तूल 
औरंगाबाद येथून गावठी पिस्तूल घेऊन येणाऱ्या एकाला सोमवारी (ता. 18) "एडीएस'ने पकडले आहे. ऋषिकेश राजू जऊळकर (वय 21, रा. शेंद्रा, ता.जि. औरंगाबाद) असे या संशयिताचे नाव आहे. ऋषिकेश जऊळकर हा औरंगाबाद येथून उज्जैनपुरी (ता. बदनापूर, जि. जालना) येथे हे गावठी पिस्तूल एकाला देण्यासाठी निघाला होता. याची माहिती "एडीएस'चे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. त्यांच्या पथकाने सापळा रचून त्यास पकडले. पथकामध्ये श्री. जाधव, कर्मचारी ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण आदींचा समावेश आहे. 

"तो' टॉपचा विद्यार्थी 
ऋषिकेश राजू जऊळकर हा बी.एस्सी.चा विद्यार्थी आहे. तो औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे तो टॉपचा विद्यार्थी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ही पिस्तूल तो संशयित राजेश केशवराव शिंदे (रा. उज्जैनपुरी) यास देण्यासाठी आला होता असेही समजते. दरम्यान, राजेश शिंदे फरारी आहे. याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा : दुष्काळानंतर यंदा पाण्याबाबत दिलासा 

परवानाधारकांनी संख्याही लक्षणीय 
जिल्ह्यात गृहविभागाकडून 641 जणांना परवानाधारक शस्त्रे देण्यात आली आहेत. यात अधिकारी, बॅंकेच्या सुरक्षारक्षकांसह इतर सुरक्षारक्षकांचा समावेश आहे; मात्र राज्यात शांत जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जालन्यात 641 परवानाधारक शस्त्रधारी आणि साडेअकरा महिन्यांत सात गावठी पिस्तूल जप्त झाल्याने नेमका जिल्हा कोणत्या दिशेने चालला आहे? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

जिल्ह्यात शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून आम्ही त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. कारण असे शस्त्र बाळगणे हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घातक असल्याने अशा कारवाया करण्यावर भर दिला जात आहे. कारवाई करणाऱ्या पथकासाठी दहा हजार रुपयांचे पारितोषिकही ठेवण्यात आले आहे. 
चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना. 

loading image