पिकांचे त्वरित पंचनामे करुन अहवाल सादर करा, राज्यमंत्री बनसोडे यांचे निर्देश

युवराज धोतरे
Saturday, 26 September 2020

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

उदगीर (जि.लातूर) : सतत पडणाऱ्या पावसाने मूग, तुर व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

उदगीर तालुक्यातील नागलगाव, सुमठाण, धडकनाळ येथील अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी श्री.बनसोडे यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी श्री.नाबदे, बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती प्रा.शिवाजी मुळे, कल्याण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

२७ गावातील शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षावर पाणी ! घोणसी मंडळाचे विदारक चित्र ! 

या प्रसंगी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त एक ही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, नुकसान झालेल्या पिकाचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ भरावे. यासाठी कृषी विभागाने आॅनलाईन /आॅफलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.बनसोडे यांनी केले.

भारतीय कृषी विमा कंपनीने या नुकसानीचे पंचनाम्याबाबत अत्यंत तातडीने कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही त्यांनी दिले. या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. नदीकाठावर शेतकऱ्यांचे बंधारे वाहून गेले आहेत. तसेच बंधाऱ्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे करण्यात यावेत. या शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागामार्फत मदत करण्यात येईल असे आश्वासन राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.

लातूर जिल्ह्यात तब्बल ८०० जनावरांना लम्पी स्किन ! शेतकरी चिंताग्रस्त.

या प्रसंगी श्री मेंगशेट्टी यांनी उदगीर उपविभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनाम्याची कारवाई सुरू असून येथील एक ही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediately Do Panchanamas Of Crops And Present Report