परभणीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी, खासदार जाधव यांच्या पाठपुराव्याला यश...

गणेश पांडे
Wednesday, 12 August 2020

खासदार संजय जाधव यांनी मानवत (जि.परभणी) ते नसरतपूर (ता.वसमत) या राष्ट्रीय महामार्गासाठी व परभणी बायपास (बाह्य वळण) रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता.

परभणी ः बहुप्रतिक्षित परभणी बायपास रस्त्याच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना बुधवारी (ता.१२) दिले आहे.

खासदार संजय जाधव यांनी मानवत (जि.परभणी) ते नसरतपूर (ता.वसमत) या राष्ट्रीय महामार्गासाठी व परभणी बायपास (बाह्य वळण) रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता. (ता.आठ) डिसेंबर २०१९ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून खासदार संजय जाधव यांनी सदर राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व विस्तारीकरण तथा बायपास रस्त्याच्या संदर्भात पत्र दिले होते.

हेही वाचा - आगळावेगळा उपक्रम ; ‘डॉग हॅन्डलर्स’नी घेतले श्वान आरोग्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षण... 

रस्त्याची एकूण लांबी १७.५ किलोमीटर 
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नुकतेच खासदार संजय जाधव यांना एक पत्र पाठवले असून या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे नमूद केले आहे. बायपास रस्त्याची एकूण लांबी १७.५ किलोमीटर असून त्यापैकी ८.५ किलोमीटर रस्ता चार पदरी तर नऊ किलोमीटर रस्ता दोन पदरी समाविष्ट असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ‘वंचित’चे पदाधिकारी रस्त्यावर, कुठे ते वाचा...

आर्थिक वर्षात विस्तारीकरणाला मंजुरी
सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या मजबुतीकरणाचे मुख्य उद्दीष्ट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गाच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या चालू असलेले काम पूर्ण झाल्यानंतर २०२०-२१ या आर्थिक वर्षात विस्तारीकरणाला मंजुरी दिली जाईल, असे या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे परभणी बायपासच्या रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याला परवानगी दिली असून जमीन मालकांना पैसे देण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही या पत्रात दिले आहे. जमीन संपादनाचे हे काम ९० टक्के पूर्ण झाल्यावर या बायपास रस्त्याच्या कामाला चालू आर्थिक वर्षात मंजुरी दिली जाईल, असेही गडकरी यांनी खासदार जाधव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे  

बायपास रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेऊन या रस्त्याच्या कामाला निधी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला व बहुप्रतिक्षित असा परभणी बायपास रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून परभणीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने बायपास रस्त्याच्या हद्दीतील जमीन संपादनाचे काम लवकर आणि युद्धपातळीवर करावे.
- संजय जाधव, खासदार, परभणी.

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An important question from Parbhani's point of view is the success of MP Jadhav's pursuit ..., Parbhani News