esakal | संचारबंदीत ७.३५ लाख कुटुंबाना मिळणार मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ

बोलून बातमी शोधा

wheat and rice will be distributed

अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना ३५ किलो गहू व तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

संचारबंदीत ७.३५ लाख कुटुंबाना मिळणार मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

हिंगोली : कोरोनाच्या काळात संचारबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील एकूण ७.३५ लाख कुटुंबांना गहू व तांदळाचे मोफत वाटप केले जाणार आहे. या बाबतचे आदेश प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र यामध्ये सर्व समान्य नागरीकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना ३५ किलो गहू व तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्याने धान्याची मागणी शासनाकडे नोंदवली होती. मागणीनुसार शासनाकडून धान्याचा पुरवठाही करण्यात आला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांची संख्या २९ हजार ६३४ एवढी आहे.

या लाभार्थ्यांना ३५ किलो धान्य वाटप केले जाणार आहे. त्यासाठी ६०९२ क्विंटल गहू व ३१५३ क्विंटल तांदूळ उपलब्ध झाला आहे. या सोबतच प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये ७.०५ लाख लाभार्थ्यांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप केले जाणार आहे. त्यासाठी १८८०७ क्विंटल गहू व १२५५० क्विंटल तांदूळ उपलब्ध झाला आहे. या संदर्भात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खोडेकर यांनी पाचही तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटपाचे आदेश काढले आहेत.

लाभार्थ्यांना शासनाच्या निर्णयानुसार धान्य वाटप करून त्याची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचेही आदेश खेडेकर यांनी दिले आहेत. दरम्यान , संचारबंदीच्या काळात हातावर पोट असलेल्या लाभार्थ्यांना धान्य मिळणार असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात का होईना मिटणार आहे. पुढील काही दिवसांतच धान्य वाटपाला सुरवात होणार असल्याचे पुरवठा विभागाच्या सुत्रांनी सांगितले.