कळमनुरी तालुक्यात ‘कोरोना’चा शिरकाव, पाच गावे कंटेन्मेंट झोन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

कळमनुरी तालुक्यात रविवारी रात्री आठ कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर चाफनाथ गावला जाणारे मार्ग बंद करण्यात आले. तर आखाडा बाळापूर परिसरातील घोडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात जाणारे रस्‍ते सील करण्यात आले.

कळमनुरी ः कळमनुरी तालुक्यातील घोडा, आडा, चाफनाथ, येडसी तांडा, कांडली या पाच गावांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने या गावांना कंटेन्मेंट झोन घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी (ता. २५) काढले असून गावेदेखील सील केली आहेत.

मुंबई, पुणे, रायगड आदी हॉटस्पॉट झोनमधून रविवारी आठ कामगार परतल्यामुळे त्यांचा गावातील इतरांशी संपर्क होऊ नये म्हणून तालुक्यातील ही पाच गावांत कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे. या गावांतील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाल्याने हा आजार पसरवू नये, याची दक्षता घेत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी घोडा, आडा, चाफनाथ, येडसी तांडा, कांडली या पाच गावांची हद्द सील केली. दरम्यान, या कंटेन्मेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे.

हेही वाचा - घरोघरी नमाज अदा; ‘कोरोना’मुक्‍तीसाठी दुआ...

केवळ ग्रामपंचायतींमार्फत आवश्यकतेनुसार सेवा सुविधा
केवळ ग्रामपंचायतींमार्फत आवश्यकतेनुसार सेवा सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध साथ रोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या गावांत रुग्ण आढळून आल्याने उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या पथकाने या गावांना जाऊन भेटी दिल्या. गावातील सर्व रस्ते सीलबंद करून नागरिकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे.

हेही वाचा - वृक्षलागवडीला एक वर्ष ; व्हॉट्सअप ग्रुपने जगविली पंधराशे झाडे

घोडा येथील ४६ लोकांचे नमुने घेतले
जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या पथकाने चाफनाथ येथील दहा जणांचे नमुने घेतले, तर घोडा येथील ४६ लोकांचे नमुने घेतले असून या सर्वांना कळमनुरी येथील कोविड सेंटर येथे भरती केले आहे. येडसी तांडा आदी गावांना भेटी देऊन बाहेर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, बीडीओ मनोहर खिल्लारी यांच्या पथकानेदेखील कंटेन्मेंट झोन गावांना भेटी देऊन पाहणी केली.

घोडा येथे पोलिस बंदोबस्‍त
आखाडा बाळापूर ः बाळापूर पोलिस ठाणेअंतर्गत घोडा हे गाव सील झाले असून या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गावातून बाहेर जाण्यास तसे बाहेर गावातून गावांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. घोडा गावात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांच्या पथकाने या भागात भेट देऊन पाहणी केली तसेच पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांच्या पथकाने घोडा येथे भेट दिली. पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे गाव सील केले. गावच्या दोन्ही बाजूंनी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याशिवाय गावामध्ये आरोग्य विभागाचे पथकाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. घोडा येथील संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याच सांगण्यात आले. दरम्यान, कांडली या गावातही रुग्ण आढळून आल्यामुळे हे गावदेखील सील करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी खेडेकर यांनी दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inclusion of ‘Corona’ in Kalamanuri taluka, five villages containment zone, hingoli news