जायकवाडीतून विसर्ग वाढवला

डॉ. माधव सावरगावे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जायकवाडी धरणातून माजलगाव धरण आणि परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आला आहे.

औरंगाबाद - जायकवाडी धरणातून माजलगाव धरण आणि परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आला आहे. सुरुवातीला जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरण्यासाठी ४०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यात आता वाढ करून ९०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. तर डाव्या कालव्यातून परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी १ हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

मराठवाड्यात पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर माजलगाव धरणासाठी जायकवाडीतून जवळपास चार टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. सोबतच पाण्याअभावी परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राला दरवर्षी मोठा फटका बसतो. पाण्याअभावी काही संच बंदही करावे लागतात. त्यामुळे परळी जवळच्या खडका बंधाऱ्यात १ हजार क्युसेसने पाणी सोडून तो बंधारा भरून घेण्यात येणार आहे. पुढील काही दिवसात जायकवाडी धरणाच्या 'कॅचमेट'मध्ये (नगर आणि नाशिक जिल्हा) पाऊस झाला आणि आवक वाढली तर १५ ऑगस्टनंतर धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 

आज सकाळची जायकवाडी धरणाची स्थिती : 
1) जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी :
1520.46फुट (463.436 मीटर)
2) आवक : 20509 क्युसेक 
3) एकूण पाणी साठा : 2727.165 दलघमी 
4) जिवंत पाणी साठा : 1989.059 दलघमी
5) धरणाची टक्केवारी : 91.62%
6) उजवा कालवा विसर्ग : 900 क्यूसेक्स
7) डावा कालवा विसर्ग : 1000 क्यूसेक्स
8) पैठण जलविद्युत केंद्रामधुन विसर्ग : 1589 क्यूसेक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased discharge from Jayakwadi dam