परभणी : बियाण्यांनाही महागाईचे ‘कोंब’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inflation soybean seeds bag price increase up by 900 to 1000

परभणी : बियाण्यांनाही महागाईचे ‘कोंब’

देवगावफाटा : अंदमानमधून मॉन्सूनचा सांगावा आला. त्यामुळे शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. पण, इंधन दरवाढीमुळे पेरणीपूर्व मशागतीचा खर्चही वाढला आहे. त्यात आता बी-बियाण्यांचीही भर पडली असून, यंदा बियाण्यांनाही महागाईचे कोंब फुटल्याचे चित्र आहे. खताच्या किमती यापूर्वीच वाढलेल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांच्या एका बॅगचे भाव तर ९०० ते एक हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतीचा खर्च वाढणार आहे.

यंदा सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यातून शेतीसाठी लागणारे खत आणि बियाणेही सुटले नाही. सोयाबीन बियाण्यांच्या एका बॅगेच्या किमतीत तब्बल ९०० ते १००० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन हे पीक मुख्यत्वेकरून कोरडवाहू शेतकरी घेतात. त्यामुळे त्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागते. त्यातच पाऊस कमी झाला किंवा मॉन्सून उशिराने पोचला तर शेतकऱ्याला दुबार पेरणीलाही सामोरे जावे लागते. अगोदरच गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व ढगफुटीसदृष्य पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यात सद्य:स्थितीत पेट्रोल, गॅस व डिझेलसह खाद्य तेलाच्या दरवाढीने तर सर्वसामान्यांना पुरते हैराण केले आहे. त्यात आता बियाण्यांची भाव वाढ झाली आहे.

शेतमालाच्या भावाचे काय?

खत आणि बियाण्यांचे भाव कंपन्या ठरवतात. पण, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही. दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत असल्याने शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे सोयाबीनला सरसकट १२ हजार रुपये हमी भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

घरचेच बियाणे वापरण्यावर भर

बियाण्यांच्या किमती वाढल्याच आहेत. पण, त्यात काही वर्षांपासून बियाणे उगवण तक्रारीत वाढ होत आहे. महागडे बियाणे पेरूनही ते उगवले नसल्याने गतवर्षी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा घरचे बियाणे वापरण्यावर भर आहे. पण, सगळ्याच शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे आहे असे नाही. दुसरीकडे उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्रही वाढले आहे. त्याचा वापर बियाण्यांसाठी होऊ शकतो.

खते, बी-बियाण्यांमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही. कंपन्यांकडून होत असलेली ही वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

- सचिन गाडेकर, शेतकरी, रायपूर

Web Title: Inflation Soybean Seeds Bag Price Increase Up By 900 To 1000

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top