पडिक जमिनीवर बांबू लागवडीचा केंद्र सरकारला प्रस्ताव : पाशा पटेल

कृष्णा पिंगळे
Monday, 22 June 2020

गोदावरीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन पडिक असून या जमिनीवर केंद्र सरकार मार्फत बांबू लागवड करून परिसरातील युवकांना बांबूवर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव देणार असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी डिघोळ (ता. सोनपेठ, जि.परभणी) येथे शेतकऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करतांना सांगितले.

सोनपेठ (जि.परभणी) : गोदावरीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन पडिक असून या जमिनीवर केंद्र सरकार मार्फत बांबू लागवड करून परिसरातील युवकांना बांबूवर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव देणार असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी डिघोळ (ता. सोनपेठ, जि.परभणी) येथे शेतकऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करतांना सांगितले.
राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी रविवारी (ता. २१) सोनपेठ तालुक्यातील कृषिपर्व या शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांना एका अनौपचारिक बैठकीत मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना पाशा पटेल म्हणाले, पारंपरिक शेती ऐवजी तरुण शेतकऱ्यांनी नव्या वाटा चोखाळाव्यात. कोरोना नंतरचे जग प्रचंड बदलले जाणार असून शेतीतूनच मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरी नदीच्या दोन्हीकडेने हजारो एकर जमीन पडिक आहे. या जमिनीवर बांबू लागवड करून त्या बांबूपासून पर्यावरणपूरक वस्तू बनविण्यासाठी एखादा उद्योग उभारणीसाठी आपण प्रयत्नशील राहू व परिसरातील शेतकरी व युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारला एक प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा : ९० दिवसांत नऊ हजारांवर ‘गूड न्युज’ !
 

प्लॅस्टिकला पर्याय म्हणून बांबू
प्लॅस्टिकला पर्याय म्हणून बांबू पुढे येत आहे. मानवाला लागणाऱ्या प्लॅस्टिकच्या सगळ्या गोष्टी बांबूपासून तयार होत आहेत. केंद्र सरकार या साठी शेतकऱ्यांना मदत करत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या पडिक शेतात, बांधावर ओढ्याच्या नाल्याच्या कडेला बांबू लागवड करावी, यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन व पर्यावरण रक्षण असा दुहेरी फायदा होईल, असेही ते म्हणाले.
या वेळी शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू, भाजपचे बालाप्रसाद मुंदडा, डॉ. राजेंद्र चौधरी, वैजनाथ कराड, बाबासाहेब गर्जे, कृष्णा पिंगळे, सरपंच गोकुळ आरबाड, कृषी पर्व शेतकरी उत्पादन कंपनीचे दिलीप वाणी पाटील, हरिश्‍चंद्र पांचाळ, महादू गिरे, अतुल मोडीवाले आदीजण उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information of Pasha Patel, former Chairman, State Agricultural Value Commission Parbhani News