
शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये जनजागृती केली जात आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्वच व्यापारीही सहभागी होत आहे.
हिंगोली : ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या राज्य शासनाने कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यात जिल्हा व्यापारी महासंघानेही सहभागी होत जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे तसेच वसमतचे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा शलयचिकीत्सक किशोर श्रीवास, डॉ.मंगेश टेहरे यांच्या हस्ते ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’, ‘मेरा परिवार मेरी जिम्मेदारी’, ‘दुकान मे प्रवेश से पहले चेहरे पर मास्क या रूमाल बांधा’ असा मजकूर असलेल्या स्टीकरचे प्रकाशन झाले. यावेळी व्यापारी महासंघाचे नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवाणी, गजेंद्र बियाणी, रवींद्र सोनी, सुमित चौधरी, संजय देवडा आदी उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनासह जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु, त्याचा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे आता शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये जनजागृती केली जात आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्वच व्यापारीही सहभागी होत आहे.
हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ अखिल भारतीय व्यापारी महासंघाला संलग्न झाला असून अखिल भारतीय व्यापारी महासंघ ही देशातील व्यापाऱ्यांचे प्रतीनिधीत्व करणारी केंद्र शासनाची मान्यता प्राप्त संघटना आहे. देशातील व्यापाऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करणे, हे मुख्य उद्दिष्ट या संघटनेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशन झालेले प्रबोधनासाठीचे स्टीकर संपूर्ण जिल्ह्यातील दुकानांवर लावले जाणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाने दिली.
अनलॉकमध्ये जवळपास सर्वच व्यवहार सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकही खरेदीसाठी मनसोक्त बाहेर पडत असल्याचे दिसून येते. मात्र, मास्क किंवा तोंडाला रुमाल न बांधणे, सॅनिटायझरचा वापर न करणे आदींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना जागृत करण्यासाठी शासनाने हे अभियान सुरु केले आहे. आता जिल्ह्यात व्यापारी महासंघ शासनाच्या या उपक्रमाची माहिती गाव पातळीवर पोहचविण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच त्यांच्या आस्थापनामधून प्रत्येक वस्तूवर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले स्टीकर देखील लावणार आहेत. यामुळे शासनाच्या या उपक्रमाची माहिती घरोघरी पोहचण्यासाठी मदत होणार आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले