चक्क कडूलिंबावरच ‘अळी’चा प्रादुर्भाव !

काड्याच शिल्लक राहिलेल्या
काड्याच शिल्लक राहिलेल्या

सोनपेठ (जि. परभणी) : नैसर्गिक कीटकनाशके म्हणून ओळख असणाऱ्या कडूलिंबावरच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत असल्यामुळेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


कडूलिंब हे भारतामध्ये जंतुनाशक म्हणून मान्यता प्राप्त आहे. नैसर्गिक कीटकनाशक म्हणून याचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. 
कडुलिंब हे सर्वच दृष्टीने उपयुक्त असल्यामुळे त्याचा औषधी वापर केल्या जातो. या झाडांची पाने, फुले, फळे, साल, बियांमुळे हे सर्वच अत्यंत कडू असल्याने याचा जंतुनाशक म्हणून वापर होतो. मानवी आरोग्यात तसेच पिकांवरील अनेक रोगांवर याचा गुणकारी औषध म्हणून वापर प्रामुख्याने केला जातो.

कडूलिंबाचे निंबोळी अर्क कीटकनाशक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात. यात असलेल्या ‘अँझाडिराक्टिन’मुळे मावा, अमेरिकन बोंडअळी, तुडतुडे, देठ कुरतडणाऱ्या अळ्या, फळ माशा, खोडकिडे व पाने कुरतडणाऱ्या अळ्या यावर प्रभावी औषध म्हणून कडूलिंब समजले जाते. हे अँझाडिराक्टिन लिंबाच्या पानातही असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कडूलिंबाच्या झाडांवरच पाने कुरतडणाऱ्या हिरव्या अळीचा मोठा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे.

पानांच्या जागी अळ्या 
 या अळ्या लिंबाच्या झाडाची पाने पूर्णतः खाऊन टाकत असून पानांच्या जागी अतिशय खादाड असणाऱ्या या अळ्याच दिसून येत आहेत. या अळ्या पाने खाऊन केवळ शिराच शिल्लक ठेवत आहेत. त्यामुळे लिंबाच्या झाडावर केवळ काड्याच दिसत आहेत. कुठल्याही लिंबाच्या झाडाखाली गेल्यावर या हिरव्या अळ्यांचा सडाच पाहवयास मिळत आहे.

जगभरात पाने खाणाऱ्या अळीवर प्रभावी नैसर्गिक कीटकनाशक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लिंबाच्या झाडावरच या घातक अळ्या आढळून येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कडूलिंबाच्या झाडावर पडलेल्या या किडीमुळे कडुलिंब हे नैसर्गिक कीटकनाशक असल्याची अंधश्रद्धाच ठरते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. कडुलिंबाच्या झाडावर पडलेल्या या किडीमुळे कडुलिंब हा आपला नैसर्गिक कीटकनाशकाची मूळ ओळखच लोप पावते की काय? असा सवालदेखील उपस्थित होत आहे. 

नियंत्रण करणे अशक्य होणार
हरित क्रांतीनंतर सूक्ष्मजीव व कीटकांच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक कीटकनाशके किंवा जंतुनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणात सध्या होत आहे. किंबहुना त्याचा वापर गरजेपेक्षा जास्त केला गेला आहे. त्यामुळे या जंतू व कीटकांमध्ये या रासायनिक घटकांप्रती प्रतिकार क्षमता आलेली पाहवयास मिळते. ज्याप्रमाणे रासायनिक औषधांचा वापर वाढलेला आहे, त्याचप्रमाणे निंबोळी अर्क हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वापरले जात आहे. पर्यायाने त्याचीसुद्धा प्रतिकार क्षमता या कीटकांमध्ये व जंतूमध्ये आलेली पाहवयास मिळते.  आज काल कडूनिंबाच्या झाडांवरसुद्धा किटकांचा व जंतूंचा प्रादुर्भाव हल्ली होत असलेला पाहवयास मिळत आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस मनुष्याला कीटकांवर नियंत्रण करणे अशक्य होणार आहे. अश्या प्रकारे जिवाणूंचे सुपरबग तयार झालेले उदाहरणही आपणास पाहवयास मिळतात. 
- प्रा. डॉ. मुकूंदराज पाटील,  वनस्पतीशास्त्रज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com