बीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड; नेमके काय आहे मूळ प्रकरण..

बीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड; नेमके काय आहे मूळ प्रकरण..

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची बीड जिल्ह्यात हत्या झाली. ही घटना केज तालुक्यातील मांगवडगाव येथे घडली. शेतीच्या जुन्या वादातून बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून जवळपास मागील १० वर्षापासून चालू असलेल्या वादात काही तत्कालीन कारणाची ठिणगी पडली आणि हे हत्याकांड घडले.

या हत्याकांडात पारधी समाजाच्या तिघांची हत्या करण्यात आली आहे. मयतांमध्ये वडील व दोन मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी (ता.१३) रोजी मध्यरात्री घडली आहे. या घडलेल्या हत्याकांडास कारणीभूत असलेल्या निंबाळकर कुटुंबातील आणि त्यांची जवळीक असणाऱ्या चौदा जणांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. 

नेमकं काय घडलं?
१७ वर्षापासून निंबाळकर आणि पारधी समाजातील पवार कुटुंबियात शेतीवरुन वाद होता. पारधी समाजातील पवार कुटुंबिय हे जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई येथे  सध्या वास्तव्यास आहे. परंतु, दरवर्षी ते एप्रिल मेच्या दरम्यान शेती वहित करण्याच्या हेतूने गावात येत असत. परंतु, ही शेती निंबाळकर कुंटुबियाकडे वहित असल्याने पवार कुटुंबियांना ही शेती वहित करता येत नव्हती आणि त्या शेतीतील पिकाचा त्यांना उपभोग घेता येत नव्हता. यावरून सातत्याने चिडचिड होऊन दोन्ही कुटुंबा मध्ये वाद होत होते. 

या वादाला साधारणतः साधारणतः १६ वर्षापूर्वी सुरवात झाली असल्याचे गावकरी सांगतात. १६ वर्षापूर्वी दोन्ही कुटुंबात कलह निर्माण झाला होता. त्यावेळीही पोलिसांत फिर्याद देण्यात आली होती. परंतु, हा कलह मिटला नाही. दोन्ही कुटुंबाच्या मनात राग कायम राहिला. त्यांनंतर साधारणतः १४ ते १५ वर्षापूर्वी म्हणजे २००६ मध्ये निंबाळकर कुटुंबियातील एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत सातत्याने असणारी एक व्यक्ती असे दोघेजण अचानक गायब झाले. या गायब होण्यामागे पवार कुटुंबियाचा हात असल्याचा दाट संशय निंबाळकर कुटुंबियांना होता. परंतु, या केसच्या निकालात न्यायालयाने पवार कुटुंबियांची पुराव्याअभावी निर्दोश मुक्तता केली होती. पवार कुटुंबिय निर्दोष सुटल्याने निंबाळकर कुटुंबियांच्या मनात पवार कुटुंबियांविरुद्ध राग आणखी तीव्र झाला. या रागाच्या भावनेतूनच ही घटना घडली असल्याचे गावकरी सांगतात.

ती जमीन नेमकी कोणाची?
ज्या जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे ती एकूण १० एकर जमीन असल्याचे बोलले जात आहे. ही १० एकर जमीन ही मूळ निंबाळकर कुटुंबियांनी विकत घेतली असल्याचे गावकरी म्हणतात. परंतु, यामध्ये कूळ कायद्यानुसार पवार कुटुंबियाचे कूळ लागले असल्याने पवार कुटुंबिय या जमिनीवर आपला हक्क सांगत आहेत. याचा न्यायालयात वाद सुरु आहे.

त्या रात्री नेमकं काय घडलं?
पवार कुटुंबीय वाद करण्याच्याच हेतूने आणि शेत जमिनीची नांगरणी करण्याच्या हेतूने अंबाजोगाई येथून शेतात आले, असल्याचे सांगितले जाते. तीन दुचाकीवर मिळून ते रात्रीच्या वेळी शेतात आले होते. त्यानंतर त्यांनी निंबाळकर कुटुंबियातील सदस्यासोबत शिवीगाळ चालू केली. यातून कलह वाढत गेला. मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाला. अशात निंबाळकर कुटुंबियांकडून काही व्यक्तींची जमवाजमव झाली. अशात आपल्यावर मोठा हल्ला होत असल्याचे पवार कुटुंबियांच्या लक्षात आले. आपल्यात हा हल्ला परतवून लावण्याची ताकद नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पळापळ सुरू केली. यावेळी जवळच असलेल्या कळंब अंबाजोगाई रोडवर मांजरा नदीवर असलेल्या चेक पॉइंटवर पवार कुटुंबियातील दोन लहान मुले पोहोचली. यावेळी युसुफ वडगाव हद्दीतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असता या घटनेविषयी माहिती दिली. साधारणतः ही घडना रात्री १०:३० च्या सुमारास घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीतून मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षदर्शी पोलिसांनी पाहिल्यावर वादविवादातून शेतातील उपकरणे (उदा. कुऱ्हाड, कोयते) अशा धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. त्या वादात हे हत्याकांड झाले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाले. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधिक्षक राहूल धस, पोलिस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन व सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद झोटे यांनी गुरूवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उरलेल्या हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक गावात रवाना झाले आहे. संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलिस कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
घटनेनंतर मृतदेह केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी मयताचे नातेवाईक आणि पारधी समाजाच्या नागरिकांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रचंड गोंधळ घातला. रात्री उशीरापर्यंत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नव्हता. त्यांनी या प्रकरणात स्थानिक सरपंच, पोलीस पाटील व इतरांची नावे आरोपी म्हणून घ्यावीत अशी मागणी लावून धरलेली आहे. मात्र पोलीसांनी सत्यता तपासूनच गुन्ह्यात नावे घेतली जातील, अशी भुमिका घेतलेली आहे. 

हा वाद मागील १७ वर्षांपासून होता. हे प्रकरण शेतीच्या वादातून घडले असून मांजरा नदीवरील चेकपॉइंट वरील पोलिसांना माहिती मिळाल्यावर आम्ही घटना स्थळी पोहोचलो आणि पुढील कारवाई केली. घटनेची फिर्याद धनराज बाबू पवार यांनी दिली आहे. - आनंद झोटे, सहायक पोलिस निरीक्षक युसुफ वडगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com