esakal | ‘आरटीई’त गैरप्रकार उघड, खोट्या माहितीवर शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

1rte

‘आरटीई’च्या वर्ष २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेत काही पालकांनी खोटी माहिती भरून प्रवेश बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार परळी तालुक्यात उघड झाले आहे.

‘आरटीई’त गैरप्रकार उघड, खोट्या माहितीवर शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : ‘आरटीई’च्या वर्ष २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेत काही पालकांनी खोटी माहिती भरून प्रवेश बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार परळी तालुक्यात उघड झाले आहे. प्रक्रिया होऊन लॉटरी पद्धतीने तालुक्यातील ४१२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळाला असला तरी कागदपत्र तपासणीत हा प्रकार उघड झाल्याने परळीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली.

यावरून शिक्षण विभागाने समिती नेमून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील पाल्यांना चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून शिक्षणाचा अधिकार या योजनांतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर पालकांकडून आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज मागविण्यात येऊन त्याची लॉटरी पद्धतीने सोडत काढून पाल्याना प्रवेश देण्यात येतो.

जालना जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; आंदोलने, उपोषण, मोर्चे आणि निदर्शने...  

यावर्षीच्या शैक्षणिक वर्षासाठीही अशाच पद्धतीने मागविलेल्या ऑनलाइन अर्जात काही पालकांनी खोटी माहिती भरून गैरप्रकार करत प्रवेश बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचे परळी तालुक्यात उघड झाले आहे. यावर्षीच्या आरटीईअंतर्गत प्रवेशासाठीची १७ मार्चला लॉटरी पद्धतीने सोडत होऊन परळी तालुक्यातील ४१२ विद्यार्थ्यांची निवड झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीच्या प्रवेशाच्या कागदपत्राची तपासणी शाळास्तरावर करून ती तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे पाठविले.

यावेळी कागदपत्राच्या तपासणीत काही पालकांनी ऑनलाइन पार्टलवर चुकीची, खोटी माहिती भरून आरटीई प्रवेश बळकावल्याचे निदर्शनास आले. ही बाब परळी येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी झालेल्या प्रवेशावर आक्षेप घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना रीतसर तक्रार दाखल केली. या गैरप्रकारामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फसला गेला असून, ज्या सर्वसामान्य कुटुंबातील पाल्यांसाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे ते पाल्य शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीची तत्काळ दाखल घेतली. संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमून केलेल्या चौकशीचा अहवाल तत्काळ देण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.

शेतवस्तीवर चोरट्यांचा दरोडा; सोन्या, चांदीच्या दागिन्यासह एक लाख ५८ हजार...

दोषी पालकांवर होणार कारवाई
ज्या पालकांनी चुकीची, खोटी माहिती भरून आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला आहे ते कागदपत्र तपासणीत उघड झाले आहेत. यामुळे शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीकडून कसून चौकशी करीत गैरप्रकार करणाऱ्या पालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

गुन्हे दाखल करा : जाधव
परळी तालुक्यात आरटीईअंतर्गत प्रवेशात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याने खरे गरीब, गरजवंत प्रवेशापासून वंचित राहत आहेत. आरटीई हा एक कायदा असून, त्याची पायमल्ली करणारे पालक, शाळा, कर्मचारी, बोगस प्रवेश करून देणाऱ्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, जेणे करून या पुढे गोरगरिबांच्या प्रवेशावर कोणी डल्ला मारणार नाही, अशी मागणी आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर