अवकाळीचा वाढला मुक्काम; पाच दिवस धोक्याचे !

file photo
file photo

परभणी : मराठवाड्यात सध्या अवकाळी पावसाचे तडाखे सुरू आहे. दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. आता पुन्हा पुढील पाच दिवस पावसाचा काही ठिकाणी मुक्काम कायम राहणार असून मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्‍वच्‍छ ते अंशत: ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी  मौसम सेवा विभागाने वर्तविली आहे.

मागील १५ दिवसांपासून मराठवाड्यात गारांसह अवकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ३०) रात्री विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्याच्या सोबतीने पावसाने हजेरी लावली. काढणी सुरू असलेल्या रब्बी हंगामातील पिकांची नासधूस आणि फळबागांचे नुकसान केल्यानंतरही पावसाने मन भरले नसून आणखी काही दिवस पाऊस पडणार आहे. पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी  मौसम सेवा विभागाने वर्तविली आहे. 

कापणी केलेल्या पिकांवर ताडपत्री झाका
सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने कापणी केलेल्या पिकांचे ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेला शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. हळद काढणीनंतर ती उकडून वाळत टाकली असल्‍यास, ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावी. या आठवड्यात पावसापासून हळदीचे संरक्षण करावे.

केळीच्या झाडांना आधार द्यावा
हळदीला थोडेही पाणी लागल्‍यास हळदीची प्रत खलावते. जून २०१९ मध्‍ये लागवड केलेल्‍या केळीच्‍या बागेस घडांच्‍या वजनामुळे केळीचे झाड कोलमडू नये म्‍हणून झाडांना आधार द्यावा. तसेच झाडास माती लावावी, आंबा फळबागेत जिब्रॅलिक ॲसिड एक ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी, काढणीस तयार असलेल्‍या द्राक्ष घडांची काढणी करून घ्‍यावी. काढणी करत असताना मजुरांमध्‍ये तीन ते पाच फूट सुरक्षित अंतर ठेवावे. ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेल्‍या पावसामुळे मिरची व टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्‍हणून मॅन्‍कोझेब ७५ डब्‍ल्‍यूपी २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी, काढणीस तयार असलेल्‍या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत सुरक्षित अंतर ठेवून विक्री करावी, असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com