Jalana : अर्जुन खोतकरांना विधान परिषदेचे बक्षीस? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun khotkar

Jalana : अर्जुन खोतकरांना विधान परिषदेचे बक्षीस?

जालना : मुंबई येथे पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीनिमित्त गुरूवारी शहरात शिवसेना शिंदे गटाचा हिंदूगर्वगर्जना मेळावा झाला. या मेळाव्यात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना विधान परिषदेचे बक्षिसासह मंत्रिपद मिळेल, असा सूर नेत्यांच्या भाषणांतून उमटला.

टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या मेळाव्यास कृषीमंत्री अब्दुल सत्तार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, उपनेते विजय नाहटा, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, अभिमन्यू खोतकर यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री श्री. सत्तार म्हणाले, की पाच ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात प्रचंड गर्दी होणार आहे. दुपारी दसरा मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचावे लागणार आहे. सिल्लोड येथून पाचशे बसगाड्या मुंबईला दसरा मेळाव्यास जाणार आहेत. जालन्यातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी या मेळाव्यासाठी यावे. मेळावा संपल्यानंतर वणीच्या देवीचे दर्शन घेऊ या. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढविला. ते मराठवाड्याचे नेते आहेत. त्यांच्या बाबत राजकीय अपघात झाला.

त्यामुळे त्यांच्या पक्ष कार्याचे बक्षीस म्हणून विधान परिषदेच्या यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय लोकसभा निवडणुकीसाठी अनुमोदक म्हणूनही पहिला मी असेल, असे श्री. सत्तार यांनी नमूद केले. या प्रसंगी हिंगोलीचे खासदार श्री. पाटील म्हणाले, की मागील अडीच वर्ष आमचे काहीच काम झाले नाही. ज्या काँग्रेससोबत आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्यासोबत एकत्र बसण्याची वेळ आली. मात्र, आता परिस्थिती बदली आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे ही मराठवाड्यात राजकीय वजन आहे. त्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून विधान परिषदेसह मंत्रिमंडळात संधी मिळावी, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली.

श्री. खोतकर म्हणाले, की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार दाबला जात होता. मात्र, हा विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतले. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पुढील काळात जालन्यात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दोन डगरीवर हात ठेवू नये. अनेकांना आपण पदे देऊन मोठे केले आहे. मात्र, ते येत नसतील तर त्यांना सोडून द्या, असे श्री. खोतकर यांनी स्पष्ट केले.

मेळाव्यानिमित्त दुचाकी फेरी

शिवसेना शिंदे गट हिंदूगर्वगर्जना मेळाव्यानिमित्त निमित्त जालना शहरात दुचाकी फेरी काढण्यात आली. मोतीबाग येथून फेरीला सुरवात झाली. मोतीबाग, जिल्हाधिकारी, अंबड चौफुली, नूतन वसाहत, शनिमंदिर मार्गे टाऊन हॉल येथे फेरीचा समारोप झाला. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर, उपनेते विजय नाहटा, खासदार हेमंत पाटील, अभिमन्यू खोतकर, पंडित भुतेकर, भाऊसाहेब घुगे, आत्मानंद भक्त, फिरोज तांबोळी यांच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.